Sunday , February 5 2023
Breaking News

बाहुला-बाहुलीचे लग्न

भारती फुलमाळे यांच्या घरात आनंदाचे वातावरण होते. घरात गोड-धोड आणि सोबतीला मटण शिजवणे सुरू होते. नातेवाईक मंडळी नटून-थटून जमत एकमेकांना शुभेच्छा देत होते. निमित्त होते भारती यांचा चार महिन्यांचा मुलगा राजकुमार यांच्या विवाहाचे. नवरी मुलगी म्हणून शेजारच्या झोपडीतल्या दोन महिन्यांच्या राणी शामसुंदरला नटवले होते. हे सर्व पाहून काही वर्षांपूर्वी (आता मुले कायम मोबाईल मधील गेम खेळत असतात) सुट्टीत मुले एकत्र आल्यावर लहानमुले बाहुला – बाहुलीचे लग्न खेळत असत. त्यासाठी त्यांची सुरू असलेली लगबग. त्या चिमूरड्या साडी म्हणून अंगा भोवती पंचा गुंडाळून पदर सावरत हातात आपली बाहुली किंवा बाहुला घेऊन त्याला नटवीत असत. त्यांचे लुटुपुटूचे लग्न लावीत. नंतर सगळ्यांना खाऊ वाटत या सगळ्याची आठवण  आल्याशिवाय रहात नाही. हा प्रसंग उत्तरप्रदेश किंवा राजस्थान मधला असेल असा आपला समज झाला असेल, पण तसे नसून हा आपल्या पुरोगामी म्हणून मिरवणार्‍या महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर शहरातल्या ईदगाह रोडवरील फुलमाळे कुटुंबाच्या

घरातील होता.

महाराष्ट्र-आंध्रप्रदेशच्या सीमेवरील राजभोई समाजात बाळाचा जन्म होताच, पोटाला टिळा लावून जवळच्या कुटुंबात विवाह लावण्याची प्रथा आहे. मुलगी वयात आली की, कायमची सासरी पाठवली जाते. यामुळे कुटूंब एकसंघ राहते. मुलगी बाहेरच्या घरात दिल्याने वाद होत नाहीत. मुलगी पळून जाणे किंवा खानदानाची इज्जत धूळीत मिळवण्याची भीती राहत नाही. मात्र, बालपणाचा आनंद घेण्याच्या वयात घर, कुटूंब आणि मातृत्त्वाची जबाबदारी आल्याने मुलगी गोंधळते. कमी वयात आई झाल्याने जन्माला येणारे बाळ कुपोषित, आजारी राहते. पुढील पिढीचे नुकसान होते, याबद्दल त्यांना काहीच वाटत नाही.

राजभोई समाजातील पुरुष काम करत नाहीत. ते व्यसनाधीन आहेत. सकाळी निघताना महिला त्यांना दारूसाठी 40 रुपये देतात. संध्याकाळी घरी परतल्यावर परत एकदा 100 रुपये द्यावे लागतात. दिवसभर ते दारू पिऊन घरात राहतात. पैसे नाही दिले तर मारहाण करतात. शिवीगाळ करतात. त्यांची भांडणे बघण्यासाठी लोक गोळा होतात. आम्ही काम केले तर बायका काय करतील? आमचा आदर राखणे, काळजी घेणे त्यांची जबाबदारी असल्याचे पुरुष म्हणतात. घरातील सर्वच महिला निरक्षर आहेत. त्यांची मुलेही शिकत नाहीत. मोठी मुले वडिलांसोबत घरात थांबतात. त्यांना कमी वयात व्यसनांची सवय लागते. काही मुले कचरा वेचण्यासाठी

आईसोबत बाहेर जातात.

लक्ष्मीबाई या ज्येष्ठ महिलेने सांगितले की, महाराष्ट्रात आम्हाला मसनजोगी म्हणतात. कदाचित आमचे पूर्वज हे काम करत असावेत. आम्ही मात्र मजूरी, भीक मागण्याचे काम करत आलोय. मुली आम्हाला जड वाटतात. उगाच पाय भरकटला, वाया गेल्या तर काय करणार? यामुळे बालपणीच त्यांचा विवाह जुळवण्याची प्रथा आहे. यामुळे मुली घरातल्या घरातच राहतात. इतर सदस्य तिची काळजी घेतात. जन्माला आलेल्या बाळासाठी मुलगा किंवा मुलीचा शोध सुरू असतो. कधी कधी तर पोटातल्या गर्भाशी विवाह लावला जातो. भारती फुलमाळे यांचा चार महिन्यांचा मुलगा राजकुमार आणि शीला यांची दोन महिन्यांची मुलगी राणी हिचा आज विवाह झाला होता. मुलगी वयात आल्यानंतर सासरी जाईल. आतापासून ती राजकुमारची पत्नी असेल.

महाराष्ट्र-आंध्रप्रदेशाच्या सीमेवरून 40-45 वर्षांपूर्वी मजुरांची एक टोळी कामाच्या शोधात महाराष्ट्रात आली. हाताला मिळेल ते काम केले. अनेक वर्ष शेतमजूर म्हणून राबले. मात्र शेती व्यवसायाला लागलेली उतरती कळा त्यांच्या मूळावर उठली. दुष्काळ, अवकाळी पाऊस यातून उदभवणार्‍या नापिकीमुळे काम मिळणे बंद झाले. मालक वर्ग कमी पैशात राबण्यास सांगायचा. ते न परवडल्याने भीक मागण्यास सुरुवात केली. फिरता फिरता औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात पोहचले. येथे काही दिवस भीक मागितली. दोन वर्षांपूर्वी एकाच्या ओळखीने कचरा वेचण्याचे

काम सुरु केले.

औरंगाबाद शहराजवळील वाळूज एमआयडीसीतल्या कचरा डेपोत 30 ते 35 कचरावेचक महिला आहेत. गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील लक्ष्मी आणि आरती जगधने या अनुक्रमे 16 आणि 14 वयाच्या सख्ख्या बहिणी. जगधने दाम्पत्याला चार मुली आणि दोन मुले आहेत. सुरुवातीला घरातील कर्ता पुरुष बाळू जगधने आणि त्यांच्या पत्नी सीता जगधने कचरा वेचायचे. आता जगधने दाम्पत्याच्या तीन मुली सविता, आरती आणि लक्ष्मी यासुद्धा कचरा वेचण्याच्या कामात आल्या आहेत. सकाळी कचरा वेचून शाळेत जातात. आता त्यांच्या लग्नाची

तयारी सुरू झाली आहे.

भारती, लक्ष्मी, सुमन, ताराबाई आणि सर्वच महिलांचे प्रश्न गंभीर आहेत. त्यांच्या घरात स्त्री-पुरुष समानतेचा लवलेश ही नाही. पुरुष व्यसनाधीन आहेत. गरीबी, शिक्षणाचा अभाव यामुळे या महिला खचल्या आहेत. त्यांच्या आरोग्याची हेळसांड होते. बालपणात विवाह झाल्याने मुलेही लवकर होतात. पोटभर, पोषक खायला मिळत नसल्याने मुलांची वाढ होत नाही. बाळाच्या जन्मानंतरचे हजार  दिवस पुढील आयुष्यासाठी महत्त्वाचे असतात. मात्र, या महिलांच्या लेखी यास काहीच महत्त्व नाही. या महिलांना चांगल्या आरोग्याचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे. सरकारी दवाखान्यात मिळणारे उपचार, अंगणवाड्यात मिळणारा पोषक आहार या विषयी त्यांना काही माहिती नाही.

-नितीन देशमुख (7875035636)

Check Also

कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल …

Leave a Reply