Breaking News

पनवेलमध्ये सहा नवे रुग्ण

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात सहा नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यातील चार कामोठ्यातील, तर नवीन पनवेल व सुकापूर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. या नव्या रुग्णांमुळे कोरोनाग्रस्तांची संख्या पनवेल महापालिका क्षेत्रात 49, तालुक्यात 58, तर जिल्ह्यात 70 झाली आहे. पनवेलमधून मोठ्या प्रमाणात नोकरी-व्यवसायासाठी नागरिक मुंबईला जात असतात. त्यांना कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचे दिसून येत आहे.  
कामोठे येथील 53 वर्षीय पोलीस असलेली व्यक्ती मुंबई येथे कामाला असून त्याच्यावर कॅन्सरचे उपचारही सुरू होते. तो रोज कामोठे ते सीएसएमटी असा बसने प्रवास करीत होता. त्याला प्रवासात किंवा कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा अंदाज आहे. दुसरी व्यक्ती 44 वर्षीय महिला असून, ती सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई हॉस्पिटलमध्ये सफाई कामगार आहे. कुर्ल्यातील भाभा हॉस्पिटलमध्ये तिच्यावर 16 एप्रिलपासून उपचार सुरू आहेत. तिसरी 29 वर्षीय व्यक्ती ट्रॉम्बे म्युनिसिपल डिस्पेन्सरीत फार्मासिस्ट म्हणून काम करीत आहे. त्याच्यावर पनवेलच्या कोविड (उपजिल्हा) रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कामोठे सेक्टर 15 येथील चौथी 37 वर्षीय व्यक्ती आय-टीव्ही भारत यामध्ये पत्रकार म्हणून काम करीत आहे. सध्या या व्यक्तीला गोरेगावच्या फर्म हॉटेलमध्ये विलगीकरण कक्षात ठेवले आहे. नवीन पनवेल येथील 27 वर्षीय महिला सायन हॉस्पिटल येथे स्टाफ नर्स असून तिच्यावर सेव्हन हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, तर पनवेल ग्रामीणमध्ये सुकापूर येथील 34 वर्षीय निंबेश्वर सोसायटीतील बीएमसीमध्ये कामाला असणार्‍या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती आणि कामोठ्यातील पॉझिटिव्ह हे मित्र आहेत.
दरम्यान, पनवेल महापालिका हद्दीतील 631  जणांची टेस्ट केली आहे. त्यापैकी 535 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून, 47 जणांचे रिपोर्ट अद्याप मिळाले नाहीत. सायन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या व्यक्तीला पूर्ण बरी झाल्याने घरी पाठवण्यात आले. कोरोना पॉझिटिव्हपैकी कळंबोलीतील 10, खारघर व कामोठ्यातील प्रत्येकी तीन व घोट एक असे 17 जण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply