Breaking News

खासदार संजय राऊत उद्धव ठाकरेंवर नाराज?

‘त्या’ फेसबुक पोस्टद्वारे चर्चेला उधाण

मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना खासदार संजय राऊत हे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असल्याचे आता उघड झाले आहे. याचे कारण आहे एक फेसबुक पोस्ट. राऊत यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून उद्धव यांच्यावर निशाणा साधला असून, त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे. ‘हमेशा ऐसे व्यक्ति को संभाल के रखिये जिसने आपको ये तीन भेंट दी हो, साथ, समय और समर्पण.’ या पोस्टसाठी राऊत यांनी निवडलेला फोटोही सूचक आहे. एका हातातून वाळू निसटताना दाखवण्यात आली आहे आणि त्या फोटोच्या बॅकग्राऊंडवर हे खास शब्द लिहिण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या निकालात खरंतर महायुतीला कौल मिळाला होता, मात्र मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार ही भूमिका सातत्याने संजय राऊत यांनी लावून धरली. दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना वारंवार भेटून त्यांना शिवसेनेची बाजू समजावून सांगणे, काँग्रेस नेत्यांची भेट घेणे, महाविकास आघाडीला आकार देणे यामध्ये राऊत यांचा सिंहाचा वाटा होता. रोज सकाळी राऊत पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडत होते. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, हे ते सांगत राहिले. आता त्यांनी जी फेसबुक पोस्ट लिहिली आहे त्यावरून ते उद्धव ठाकरेंवर नाराज आहेत असेच दिसते. कारण त्यातून त्यांनी सूचित केले आहे की अशा व्यक्तींना कायम सांभाळा जी व्यक्ती तुम्हाला साथ, वेळ आणि समर्पण देते.
संजय राऊत हे मंत्रिमंडळ विस्ताराच्या दिवशीही गैरहजर होते. बंधू सुनील यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने संजय हे नाराज आहेत, अशी चर्चा त्या दिवशी रंगली होती, पण या चर्चांना अर्थ नाही, असे दस्तुरखुद्द त्यांनीच स्पष्ट केले होते. या स्पष्टीकरणाला दोन दिवस उलटत नाहीत तोच त्यांनी जी फेसबुक पोस्ट लिहिलीय त्यावरून ते उद्धव ठाकरेंवर नाराज असल्याचे समजते.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply