विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती टीका
पालघर : प्रतिनिधी
जनतेने आम्हाला जनमत दिले होते, मात्र शिवसेनेने बेईमानी केली. त्यामुळे हे बेईमानी करून तयार झालेले सरकार आहे, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर बुधवारी (दि. 1) घणाघाती टीका केला. पालघरमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. वर्गात पहिला आलेल्या मुलाला बाहेर बसविण्यात आले, असा टोलाही फडणवीस यांनी या वेळी लगावला.
महाराष्ट्रातील सध्याचे सरकार फक्त सोयीसाठी आलेले सरकार आहे. एक महिना मंत्रिमंडळ न बनवण्याची नामुष्की या सरकारवर आली. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर शिवसेनेतील आमदार पक्षाने दिलेला शब्द पाळला नाही म्हणून नाराज आहेत. याचसोबत राष्ट्रवादीचे आमदार राजीनामा द्यायला निघाले होते. तिसरीकडे काँग्रेसने आपल्याच पक्षाचे कार्यालय फोडले. अशी अवस्था सुरुवातीलाच असेल, तर महाराष्ट्रात असे सरकार फार काळ टिकू शकत नाही, असा दावा फडणवीस यांनी केला.
फडणवीस पुढे म्हणाले की, आमचे काळजीवाहू सरकार असताना व मर्यादित अधिकार असतानादेखील शेतकर्यांना निधी देऊ केला. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट सुरू असताना राज्यपालांनी प्रतिहेक्टरी आठ हजार, तर फळबागांना प्रतिहेक्टरी 18 हजार रुपये देऊ केले, मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकर्यांना 25 हजार रुपये प्रतिहेक्टरी देण्याचा शब्द पाळला नाही. शेतकर्यांना 25 हजार रुपये प्रतिहेक्टरी देतो, असे सांगून हातात भोपळा दिला. नुकतेच चक्रीवादळही आले. त्यात अनेक मच्छीमार बांधवांचे नुकसान झाले. त्यांनाही कोणतीच मदत सरकारने केली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पैसे मागत असल्याचे सांगताहेत. महाराष्ट्रातील शेतकर्यांना दिलेला कर्जमाफीचा शब्द मोदींच्या जीवावर दिला का, असा खडा सवालही फडणवीस यांनी पुन्हा एकदा उपस्थित केला.
सत्तेसाठी शिवसेना या थराला जाईल असे वाटले नव्हते, असे सांगून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री आणेन असे बाळासाहेब ठाकरे यांना वचन दिले होते. ते वचन म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जीवावर करेन असे होते का? याचा पुनरूच्चार फडणवीस यांनी केला, तसेच आज बाळासाहेबांना स्वर्गात काय वाटत असेल, अशी टिप्पणीही केली.
यांचा राजकीय सातबारा जनतेने कोरा करावा
आम्ही आमच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफी सांगितली नसताना दिली, मात्र या सरकारने जनता आणि शेतकर्यांशी बेईमानी केली. सरसकट कर्जमाफी, सातबारा कोरा करू, विनाअट कर्जमाफी अशा घोषणा देण्यात आल्या होत्या, मात्र त्या घोषणा हवेत विरल्या. सत्तेवर असलेल्या तीन पक्षांनी फक्त जनादेशाशीच नव्हे तर शेतकर्यांशी आणि जनतेशी प्रतारणा केली. त्यांचा राजकीय सातबारा महाराष्ट्राच्या जनतेने कोरा करायला हवा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.