विद्यार्थी जीवनामध्ये तरुणांचा राजकीय पिंड घडत असतो. विचारधारा स्पष्ट होत असते. अशा वयामध्ये राजकारणाचे समाजविघातक स्वरुप अनुभवास आले तर त्यातून संभ्रमित पिढी तयार होईल अशी भीती वाटते. विचारधारांची लढाई लोकशाहीत अभिप्रेतच आहे. किंबहुना तेच लोकशाहीचे शक्तिस्थान आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त चळवळी कालांतराने राजकीय पक्ष हायजॅक करतात हा इतिहासही नाकारता येणार नाही. हे टाळावयाचे असेल तर विचारांची लढाई विचारांनीच लढायची असते हा संस्कार रुजवणे नितांत गरजेचे आहे. अन्यथा अशा प्रकरणांमध्येच अराजकाची बीजे रुजतात.
राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी झालेेल्या विद्यार्थ्यांमधील हिंसाचाराचे देशभरात ठिकठिकाणी प्रतिसाद उमटले व अजुनही उमटत आहेत. जेएनयूतील घटनेतील सर्व 34 जखमी विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचार्यांना उपचारांनंतर सोमवारी एम्स रुग्णालयातून सोडण्यात आले. त्याच सुमारास देशभरात अनेक विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात अनेक राजकीय पक्षांकडून आपापली राजकीय पोळी भाजून घेणेही सुरूच आहे. ही काळी बाजूही या सर्व प्रकाराला आहेच. अर्थात, जेएनयूमध्ये जे काही घडले त्याचे समर्थन कुठल्याही प्रकारे करता येणार नाही हेही तितकेच सत्य आहे. जेएनयूमधील विद्यार्थ्यांनी नोंदणी आणि फीवाढीच्या विरोधात जो आक्रमक पवित्रा विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात घेतला होता, त्याची परिणती चित्रपटात शोभाव्या अशा हाणामारीत झाली. या प्रकरणी डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संघटनेवर हल्ल्याचा आरोप करत आहेत तर अभाविपने हे कम्युनिस्टांचेच कारस्थान असल्याचे व्हिडिओ फितींद्वारे पुराव्यासकट म्हटले आहे. पोलीस चौकशीत या हाणामारीच्या कारस्थानाचे सूत्रधार उघडकीस येतीलच. जेएनयूतील विद्यार्थ्यांवरील कथित अत्याचारांच्या विरोधात सोमवारी मुंबईमध्ये विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. तशी ती पुण्यात देखील झाली. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येेथे उत्स्फूर्तपणे जमलेल्या शेकडो आंदोलक विद्यार्थ्यांना मुंबईकरांनी मनापासून पाठबळ दिले. गेटवे परिसरातील अनेक उपाहार गृहांनी निदर्शकांसाठी आपापली स्वच्छतागृहे देखील उघडून दिली. चहा, कॉफी तसेच नाश्त्याचे पदार्थ आवर्जून देऊ केले. विद्यार्थ्यांविषयी असलेली मुंबईकरांची ही आस्था निश्चितच कौतुकास्पद आहे. तथापि याच निदर्शनांच्या काळात एका विद्यार्थिनीने ‘फ्री काश्मीर’ (काश्मीर मुक्त करा) असा फलक टीव्ही कॅमेर्यांसमोर झळकवल्याने सारेच अचंबित झाले. विद्यार्थ्यांचे आंदोलन नेमके कुणाच्या हाती चालले आहे, यात कुठल्या राजकीय पक्षाचा दुष्ट हेतू तर नाही ना, अशा शंका मुंबईकरांना येणे साहजिकच होते. तसे पडसाद सोशल मीडियावर उमटले देखील. परंतु आजवर सदोदित अमाप देशप्रेमाचे प्रदर्शन करणार्या सत्ताधारी शिवसेनेला आता येथे मात्र काही खटकले नाही ही आश्चर्याची बाब आहे. उलटपक्षी ‘फ्री काश्मीर’ याचा अर्थ काश्मीर खोर्यातील इंटरनेट व अन्य निर्बंधांपासून मुक्ती असा होतो असा हास्यास्पद खुलासा शिवसेनेच्या प्रवक्त्यांना करावा लागला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुंबईत अवतरलेल्या या तुकडे-तुकडे गँगचा खरपूस समाचार घेतला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सत्ताधारी शिवसेनेने पाठिंबाच दिला होता. इतका की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जेएनयूच्या प्रकरणाने 26/11च्या मुंबईवरील हल्ल्याची आठवण झाली. सत्तेसाठी एखादा पक्ष कुठल्या थराला जाऊन तडजोडी करू शकतो याचे उदाहरण म्हणून मुख्यमंत्री ठाकरे यांच्या या विधानाकडे बोट दाखवावे लागेल.