पनवेल : वार्ताहर
येथील कमळ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या गुंतवणूक निधी संस्थेच्या असेटस् आणि अन्य निधी पाहता संस्थेच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवींना 100 टक्के संरक्षण देणारी रायगड जिल्ह्यातील एकमेव कमळ महिला नागरी सहकारी पतसंस्था आहे, असे उद्गार संस्थेचे संस्थापक तथा तज्ञ संचालक शशिकांत बांदोडकर यांनी काढले. संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ज्येष्ठ सभासदांच्या आणि माजी संचालकांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी मालती चंद्रकांत आंग्रे होत्या. त्यांनीही 25 वर्षे संस्थेशी निगडित असलेल्यांचा, तसेच संस्थेच्या मुख्य प्रवर्तक विजया दाबके आणि पहिली कर्मचारी मनीषा विसपुते यांचा आवर्जून उल्लेख केला. सुरुवातीला सहकारातील ज्येष्ठ कार्यकर्ते, महाराष्ट्र फेडरेशनचे माजी सरचिटणीस व पतसंस्था महासंघाचे माजी अध्यक्ष गिरीष तुळपुळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन केले. तुळपुळे यांनी आपल्या भाषणात पतसंस्थेची वाटचाल, तसेच रिझर्व्ह बँकेचा सहकारी बँकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन याची माहिती दिली. संचालक आणि व्यवस्थापन चांगले असेल, तर संस्था प्रगती करत असते. सहकार खात्याच्या घटना दुरूस्तीमुळे सभासदांना सहकार खात्याने अधिकार दिले आहेत. त्याचा वापर करून सभासदांनी संस्थेवर अंकुश ठेवावा, असे सांगून संस्थेचा पारदर्शकपणा असल्याने कमळ महिला नागरी सहकारी पतसंस्था गेली 24 वर्षे 13 टक्के लाभांश देते. संस्थेची असेटस् पाहता आणि गुंतवणूक
पाहता संस्था निश्चित ठेवींना 100 टक्के संरक्षण देऊ शकते, असे त्यांनी म्हटले.
या वेळी उपाध्यक्ष विभावरी कुळकर्णी, ज्येष्ठ संचालिका अपर्णा पेंडसे, दीपाली धावत्रे, योगिता मांडरे, पूनम बांदोडकर, अॅड. विभा पाटील, उर्मिला वंजारी उपस्थित होत्या. पूर्वा खेडेकर व नंदा तेजे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक समिती आणि कर्मचार्यांनी मोलाचे सहकार्य केले.