Breaking News

तिसर्या डोळ्यातच कचरा; खोपोली पालिकेच्या सीसीटीव्हीवर कोळीष्ट जाळ्या

खोपोली : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील सर्वांत श्रीमंत नगरपालिका म्हणून खोपोलीची ओळख सर्वदूर आहे. याच नगरपालिकेच्या कारभारावर तिसर्‍या डोळ्याच्या माध्यमातून नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याच्या माध्यमातून कामचुकार, कर्मचार्‍यांशी वाईट वर्तन करणारा किंवा चोर्‍या यावर करडी नजर ठेवली जात आहे, मात्र या तिसर्‍या डोळ्यासमोर कोळीष्टाने आपले जाळे विणून त्याची नजर बंद केली आहे. त्याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून नगरपालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी किती कार्यक्षम आहेत हे दिसून येते.

खोपोली नगरपालिकेचा संपूर्ण देशात स्वच्छतेसाठी 28वा क्रमांक आला आहे, तर राज्यातही स्वच्छतेसाठी तीन स्टार पारितोषिक मिळविले आहे, तसेच नगरपालिकेने स्वच्छता व घनकचरा निर्मूलनासाठी जवळपास चार कोटी रुपये निधी खर्ची पाडला आहे. हा एवढा निधी खर्ची पाडून नगरपालिकेचा फायदा तो काय, असा प्रश्न यानिमित्ताने खोपोलीनगरीतील सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

खोपोली नगरपालिकेच्या मुख्य इमारतीसमोर लावलेला तिसरा डोळा कोळीष्टाने आपल्या वर्चस्वाने बंद करून टाकलेला पाहायला मिळत आहे. हा डोळा नक्की नगरपालिकेचे संरक्षण करण्यासाठी लावण्यात आलेला आहे की फक्त लोकांना भीती निर्माण व्हावी यासाठी लावण्यात आला आहे हेच समजत नाही. यासाठी लाखो रुपयांचा निधी नगरपालिकेने आपल्या तिजोरीतून खर्च केला आहे, मात्र स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने सीसीटीव्ही कॅमेरे तर आहेत पण निष्क्रिय बनले आहेत. याबाबत नगरपालिका प्रशासकीय अधिकारी व उपमुख्याधिकारी गौतम भगडे यांना विचारले असता त्वरित सर्व सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची स्वच्छता करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याने होणार्‍या अंगणवाडीच्या कामाचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील भोकरपाडा येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे अंगणवाडीसाठी निधीमंजूर झाला …

Leave a Reply