कर्जत : विजय मांडे
कर्जत शहरातील मुद्रे भागात राहणारे चित्रकार प्रदीप घाडगे यांच्या तैलरंगात कॅनव्हासवर काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील आर्टिस्ट सेंटर आर्ट गॅलरी (डोर हाऊस, पहिला मजला, के. दुभाष मार्ग, काळा घोडा) येथे आयोजित करण्यात आले असून, ते 11 मार्चपर्यंत रोज सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत विनामूल्य पाहण्यासाठी खुले राहणार आहे. या चित्रांमध्ये त्यांनी संवेदनशील भावविश्व साकारले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन वाडिया घांदी अॅण्ड कंपनीचे सीनियर पार्टनर अॅड. हमीद मुछाला यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात चित्रकाराने आपल्या चित्रातून कर्जत व परिसरातील साधे व आनंदी जीवन, त्यांचे सुखी आयुष्य व त्या भागात आढळणारे विविध ऋतूंमधील निसर्गाचे प्रसन्न रूप आणि त्यामुळे बहरून येणार्या मानवी मनातील चित्रवृत्ती आणि ते संवेदनशील भावविश्वाचे आकर्षक दर्शन सर्वांना घडवले आहे. प्रदीप घाडगे यांचे कलाशिक्षण खोपोली येथील चित्रकला महाविद्यालयात झाले. नंतर त्यांनी जहाँगीर कलादालन, नेहरू सेंटर कलादालन, लीला आर्ट गॅलरी- हॉटेल लीला, बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया वगैरे अनेक ठिकाणी झालेल्या एकल व सामूहिक चित्रप्रदर्शनातून आपली चित्रे रसिकांपुढे ठेवली. त्यांच्या चित्रप्रदर्शनांना नेहमी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बॉम्बे आर्ट सोसायटीतर्फे 2015मध्ये घाडगे यांना उत्तम व्यक्तीचित्रासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राजा रविवर्मा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. 2013मध्ये कर्मयोग पुरस्कार व कला वर्तन्यास उज्जैन यांच्यातर्फे 2006-2007 साली व्यक्तीचित्रासाठी रौप्यपदक आदी पुरस्कार घाडगे यांना मिळाले आहेत.
प्रदर्शनात त्यांनी ठेवलेली विविध चित्रे वास्तववादी शैलीत काढली असून त्याद्वारे कर्जत व आसपासच्या परिसरात असणार्या निसर्गसौंदर्याचे व साध्या पण आनंदी जीवनशैलीचे आणि असे मुक्त व आनंदी जीवन जगणार्या संवेदनशील तरुण स्त्रियांची मानसिकता वगैरेंचे फार अर्थपूर्ण दर्शन सर्वांना घडते. या प्रदर्शनात ठेवलेल्या भक्तीगीत गाणारा वासुदेव, बाजार, फुगडी, पिवळेजर्द आनंददायी चाफ्याचे फूल, लाल छत्री व तेथे वाट पाहणारी उत्कट व संवेदनशील तरुणी व तिचे भावविश्व वगैरे त्यांनी फार कल्पकतेने दर्शविले आहे. योग्य रंगलेपन व रंगसंगती, प्रत्येक चित्रातून प्रकट होणारे नेमके भाव आणि रचनात्मक शैली यामुळे ही चित्रे सर्वांना आवडतील व त्यांच्या मनास आकर्षित करतील यात शंका नाही.