Breaking News

फडणवीस यांच्या नेतृत्वातच महायुतीचे सरकार बनेल

नितीन गडकरी यांचा विश्वास

नागपूर : प्रतिनिधी

राज्यात सुरू झालेला राजकीय पेच लवकरच सुटणार असून, तशी चर्चा शिवसेनेशी सुरू आहे. भारतीय जनता पक्षाला सर्वात जास्त जागा मिळाल्या असल्याने देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात राज्यातील सरकार बनेल, असे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. महायुतीला जनादेश मिळाल्यामुळे भाजप-शिवसेना लवकरच सरकार स्थापन करतील, असा विश्वास गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार ही अफवा असल्याचेही ते म्हणाले. सध्या आपण दिल्लीत असून राज्यात येण्याचा प्रश्नच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात भाजप-शिवसेनेला बहुमताचा कौल मिळालेला असून, सत्तास्थापनेचा निर्णय लवकरच होईल. भारतीय जनता पक्षाचे म्हणाल तर देवेंद्र फडणवीस यांची पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली आहे. फडणवीस यांच्याच नेतृत्वात राज्यातील सरकार स्थापन होईल, असे गडकरी यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाने 105 जागा जिंकल्या असून, ते पाहता ज्याने जास्त जागा जिंकल्या आहेत त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होतो, असेही गडकरी यांनी अधोरेखित केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारला असताना गडकरी म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राजकारणाशी काहीही देणेघेणे नाही. त्यांचा संबंध राजकारणाशी जोडणे योग्यही नाही.

शिवसैनिकाच्या रूपाने फडणवीसच मुख्यमंत्री होणार : सुधीर मुनगंटीवार

मुंबई : देवेंद्र फडणवीस शिवसैनिक आहेत, असे उद्धव ठाकरेंनीच म्हटले होते. त्यामुळे शिवसैनिकाच्या रूपाने देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार, असे भाजप नेते व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. युती व्हावी हीच आमची इच्छा असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की, राज्यात अल्पमतातील सरकार बसवण्याची कोणतीही योजना नसून, शिवसेना-भाजपचे स्थिर सरकार देणार आहे.

Check Also

रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत ओमकार वेश्वी, कर्नाळा स्पोर्टस् अकॅडमी संघ विजेते

पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांचे आधारस्तंभ, दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी …

Leave a Reply