पनवेल : रामप्रहर वृत्त
उरण आगरी समाज मंडळातर्फे दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांच्या 94व्या जयंतीनिमित्त आयोजित समूह गीतगायन स्पर्धेत नवीन पनवेल येथील मराठी माध्यमाच्या चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. रोख रक्कम 3000 व सन्मानचिन्ह असे पारितोषिकाचे स्वरूप आहे, तसेच खुल्या गटात विद्यालयातील शिक्षकांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. रोख रक्कम 4000 व सन्मानचिन्ह असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. कार्यक्रम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला असून त्यांच्या हस्ते बक्षीस वितरणही झाले. विद्यार्थी व शिक्षकांच्या घवघवीत यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. यात ज्योती बडवी, समीता पाटील, हेमा रापते, सारिका दिवेकर, राधिका शिर्के हा शिक्षकवर्ग सहभागी झाला होता. स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे तसेच मार्गदर्शक शिक्षक वीणा कुलकर्णी व संतोष खरे यांचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका इंदूताई घरत, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख तसेच संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाच्या सर्व सदस्यांनी अभिनंदन केले. या वेळी मंडळाचे उपाध्यक्ष जे. डी. तांडेल, सचिव बी. पी. म्हात्रे, कोषाध्यक्ष अनंतराव पाटील, सहसचिव जे. एस. घरत, अंजलीताई भगत, मेघा तांडेल, अभय पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सहसचिव विजय गायकर यांनी केले. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले होते.