खोपोली : प्रतिनिधी
स्वच्छ भारत अभियानाला हाळ ग्रामपंचायतीने असहकार पुकारला, अशी परिस्थिती गावात असून सर्वत्र कचर्याचे ढिग पडले आहेत. त्यामुळे संतप्त ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत.
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत महड देवस्थानालगत हाळ ग्रुप ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायत हद्दीत असणार्या खैरा लोकवस्तीत सध्या मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष होत आहे. पिण्याच्या पाण्याची जोडणीही गटारातून दिली असून, गटारे कचर्याने ओसंडून वाहत आहेत. गावात जागोजागी कचर्याचे ढिग पडले असून, महामार्गालगतदेखील कचरा टाकण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्याबात तक्रारी करूनही ग्रामसेवक गांभिर्याने घेत नसल्याने खालापूर पंचायत समितीवर मोर्चा काढण्याची तयारी असल्याचे ग्रामस्थ अजीम मांडलेकर यांनी सांगितले. याबाबत ग्रामसेवक बढे यांच्याशी संपर्क केला असता त्यांना गांभीर्य नसल्याचे दिसले. आपल्याकडे वासांबेसारख्या अधिक उत्पन्नाच्या ग्रामपंचायतीचाही कार्यभार असल्याने तेथे नेहमी लोकांच्या गराड्यात असतो, असे उत्तर देत ग्रामसेवक बढे यांनी हाळ ग्रामपंचायतीकडे दुर्लक्ष होत असल्याची एकप्रकारे कबुली दिली.