Breaking News

भित्तिचित्रांमुळे नवी मुंबई शहराला नवा लूक

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबई महापालिकेतर्फे शहरात स्वच्छ सर्वेक्षणसाठी जोरदार तयारी सुरू आहे. त्यासाठी पालिकेकडून शहराचे सुशोभिकारण केले जात आहे. दुरुस्तीसह शहरातील उड्डाणपूल, व भिंती रंगवून त्यावर आकर्षक चित्रे व संदेश लिहिण्यात येत आहेत. मात्र ही चित्रे आता आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरू लागले असून अख्खे शहरच सेल्फी पॉईंट झाले आहे. बच्चे कंपनीदेखील आनंदाने या चित्रांजवळ घटमळू लागली आहे.

केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या तिमाही स्पर्धेतील आकडेवारीनुसार नवी मुंबई महापालिका देशात तिसर्‍या क्रमांकावर आहे. त्यामुळे येत्या दीड महिन्यात पालिकेला प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. पालिकेने शहर स्वच्छ करण्यास प्राधान्य देताना पालिकेने भिंती आकर्षक ठेवण्याकडे जास्त कल दिलेला आहे. गेले दिन महिने या भिंती  चित्रकारांकडून रंगवल्या जात आहेत. यातील महत्वपूर्ण बाब म्हणजे प्रत्येक भिंतीवर स्वच्छतेचा संदेश लिहिताना नवी मुंबईच्या  ऐतिहासिक पाऊलखुणा रेखाटण्यात आल्या आहेत.

यात येथील भूमिपुत्रांना लक्षात घेऊन आगरी कोळी समाज मासेमारी करताना, भात शेती करताना कलाकृती साकारल्या आहेत. नवी मुंबईत होत असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ  लक्षात घेता भलेमोठे विमान, क्वीन नेकलेस म्हणून गणला जाणार नवी मुंबई शहरातील पामबीच मार्ग व त्यावरील पाम ट्री, पालिका मुख्यालय, नवी मुंबईचे महत्व वाढवणारी मेट्रो, रेल्वे मार्ग, शहराची श्रीमंती दर्शवणार्‍या उंच इमारतींची सुंदर चित्रे रेखाटण्यात आली आहेत. नवी मुंबईतील पर्यवारण दर्शविण्यासाठी हिरवेगार वृक्ष, डोंगर रांगा, नवी मुंबई शहराला लाभलेला विस्तीर्ण खाडी किनारा, तसेच दरवर्षी होणारे फ्लेमिंगो पक्षांचे थवे त्यात चितरण्यात आले आहेत. त्यामुळे शहराचे बाह्य सौंदर्य शहरात उमटलेले पाहायला मिळत आहे.

अनेक ठिकाणी सेल्फी पॉइंट

सध्या स्लेफीची क्रेझ असल्याने पालिकेने शहराच्या अनेक भागांत व उद्यानांत सेल्फी पॉइंट तयार केले आहेत. त्या ठिकाणी तरुणांसोबत नागरिकांचीदेखील सेल्फी व फोटो घेण्यासाठी झुंबड उडालेली दिसून येते. पालिकेने संपूर्ण शहरात रंगांची उधळून केल्याने सेल्फी प्रेमी नागरिक मात्र मनोमन भारावून गेले आहेत.

कामगारांना आले अच्छे दिन कुंचल्यांच्या फटकार्‍यांनी साकारल्या उत्तम कलाकृती इतरवेळेस हातावर पोट असलेले रंगकाम व चित्रकारांना अच्छे दिन आले आहेत. चित्र रेखाटरणार्‍या कलाकारांना दिवसाचे 1500 रुपये मानधन दिले जात आहे. गेले दोन महिने हे कामगार मोठ्या कौशल्याने रंगांची उधळण भितींवर रेखाटताना दिसत आहेत. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणात त्यांना अच्छे दिन आले असल्याने त्यांचा कुंचलादेखील जोशात आल्याचे पहावयास मिळत आहे.

Check Also

करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …

Leave a Reply