Breaking News

रायगडात अजित पवारांचा शब्द मोडला गेला

पालकमंत्री पदावरून शिवसेनेच्या प्रकाश देसाईंची नाराजी

पाली : प्रतिनिधी
राज्यात पहिल्यांदाच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते व विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यात ज्या पक्षाचे जास्त आमदार निवडून येतील तेथे त्याच पक्षाचा पालकमंत्री होणार, असे भाष्य केले होते. त्यामुळे तीन आमदार निवडून आलेल्या रायगड जिल्ह्यात पालकमंत्रिपदाचा मान शिवसेनेला मिळणार असल्याने शिवसैनिकांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता, मात्र अजित पवार यांचा शब्द रायगड जिल्ह्यात मोडला गेला असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा युवा नेते प्रकाश देसाई यांनी पालीत पत्रकारांशी संवाद साधताना दिली.  रायगड जिल्ह्यात आदिती तटकरे यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला राज्यमंत्रिपद व पालकमंत्रिपद मिळाल्यानंतर शिवसेनेच्या राजकीय वर्तुळात खदखद सुरू झाली आहे. शिवसेनेच्या  समाजमाध्यमांवर नाराजी दर्शविणार्‍या पोस्टचा धुरळा उडत असून, सुधागडातील शिवसैनिकांत देखील नाराजीचा सूर उमटत आहे. महाविकास आघाडीपासून शिवसेना दूर चालली असल्याचे चित्र यानिमित्ताने समोर येत आहे.
महाड-पोलादपूर विधानसभा मतदारसंघात भरत गोगावले यांनी तिसर्‍यांदा विजय मिळविला. त्यांची लोकप्रियता व जनसंपर्क लक्षात घेता त्यांच्याच गळ्यात पालकमंत्रिपदाची माळ पडणे अपेक्षित होते, मात्र शिवसेनेच्या पदरी घोर निराशा आली. रायगड जिल्ह्याच्या सत्तेच्या वाटपात मापात पाप झाल्याची भावना जुनेजाणते, निष्ठावान व ज्येष्ठ शिवसैनिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीत सारे काही आलबेल दिसत असले तरी रायगड जिल्ह्यात मात्र ऑल इज वेल नसल्याची परिस्थिती स्पष्टपणे दिसत आहे.
जिल्ह्यात शिवसेनेला एकाचवेळी मंत्रिपद व पालकमंत्री पदापासून दूर ठेवल्याने जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. जिल्ह्यात ‘पालकमंत्री हटाव’ही मोहीम शिवसैनिक विविध सभांद्वारे राबविताना दिसत आहेत. अशातच प्रकाश देसाई यांनी शिवसेनेला पालकमंत्रिपद मिळावे याकरिता आम्ही शेवटपर्यंत आग्रही राहणार असल्याचे म्हटले आहे. सुधागड तालुक्यातील जि. प. सदस्य रवींद्र देशमुख, तालुका शिवसेनाप्रमुख मिलिंद देशमुख, पंचायत समिती सभापती नंदू सुतार, उपसभापती उज्ज्वला देसाई व अन्य शिवसैनिक पदाधिकार्‍यांनीही जिल्ह्याचा पालकमंत्री शंभर टक्के शिवसेनेचाच व्हावा, अशी जोरदार मागणी लावून धरली आहे.
जिल्ह्यात केवळ एक आमदार असलेल्या राष्ट्रवादीला पालकमंत्रिपद दिले असल्याचे शिवसैनिकांच्या पचनी पडलेले नाही. येत्या काळात शिवसेनेला संघटनात्मकदृष्ट्या अधिक मजबूत होण्याकरिता पालकमंत्री शिवसेनेचा होणे काळाची गरज आहे. या भावनेतून शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे रायगड शिवसेनेने मागणी केली आहे. ठाकरे यांच्यांकडून लवकरच गोड बातमी येईल, अशी अपेक्षा तमाम शिवसैनिकांना असल्याचे देसाई शेवटी म्हणाले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply