फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
हिंगोली : प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी इतके अडचणीत आहेत, पण अद्याप नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे बोलवघेवडेपणा सोडा आणि कृती करा, अशा शब्दांत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस परतीच्या पावसाने फटका बसलेल्या जिल्ह्यांचा दौरा करून परिस्थितीची पाहणी करीत आहेत. फडणवीस बुधवारी (दि. 21) हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे गेले
असता, तेथील शेतकर्यांनी त्यांच्यासमोर आपली व्यथा मांडत राज्य सरकारने तत्काळ मदत करावी यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
फडणवीस म्हणाले, मला असे वाटते की या सरकारमध्ये फक्त बोलणारे आहेत. सगळे मंत्री रोज माईक घेऊन बोलत आहेत, मीडियात येऊन बोलत आहेत, पण शेवटी पाहणार कोण आहे? निर्णय कोण घेणार आहे? सरकार निर्णय घेण्यासाठीच आहे. कोणताही निर्णय होताना दिसत नसून फक्त टोलवाटोलवी सुरू आहे. सरकारने शेतकर्यांचा आक्रोश समजून घेत तत्काळ निर्णय घ्यावा.