अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये सक्रीय राहून महाविद्यालयांच्या प्रांगणांमध्ये लोकशाही पद्धतीने आंदोलने करणारा जगत प्रकाश नड्डा नावाचा साधा कार्यकर्ता आज एका सर्वात मोठ्या व सत्ताधारी पक्षाचा अध्यक्ष झाला आहे. हा लोकशाहीतील चमत्कार फक्त भारतीय जनता पक्षातच घडू शकतो. लोकशाहीचा डंका तिन्ही त्रिकाळ वाजवणार्या तथाकथित लोकशाहीवादी पक्षांमध्ये हे घडू शकत नाही.
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी श्री. जगत प्रकाश नड्डा यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाची धुरा ते या आधीच सांभाळत होते. त्यांची निवड बिनविरोध आणि अपेक्षित अशीच असली तरीही लोकशाही व्यवस्थेच्या प्रत्येक मूल्याचा, संकेतांचा आणि नीतीनियमांचा स्वीकार करूनच ती झाली आहे याकडे लक्ष वेधणे गरजेचे आहे. कुशल संघटक आणि चतुर राजकारणी अशी त्यांची ओळख असून भारतीय जनता पक्षाचे ते 11वे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. 1970च्या दशकाच्या अखेरी-अखेरीस भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली तेव्हा भाजपचा जीव अगदीच छोटासा होता. स्व. अटलबिहारी वाजपेयी हे भाजपचे पहिले अध्यक्ष. नंतर सर्वश्री लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, कुशाभाऊ ठाकरे, बंगारू लक्ष्मण, के. जन कृष्णमूर्ती, व्यंकय्या नायडू, राजनाथ सिंह, नितिन गडकरी आणि अमित शहा अशा दहा अत्यंत कर्तृत्ववान व अनुभवसंपन्न अध्यक्षांचा वारसा जे. पी. नड्डा यांच्याकडे आला आहे. सव्वाशे वर्षांच्या इतिहासाचा टेंभा मिरवणारी काँग्रेस लोकशाहीच्या नावाने कितीही जपमाळ ओढत असली तरी एका मेहनती व निष्ठावंत कार्यकर्त्याला सर्वोच्च स्थानावर नेऊन ठेवण्याची बुद्धी काँग्रेसींना कधीही झाली नाही. त्या पक्षात लोकशाहीचा अर्थच मुळी एका खानदानाच्या चरणी निष्ठा वाहणे हा असतो. अर्थात भारतीय जनता पक्षाची रेघ मोठी करण्यासाठी अन्य पक्षांच्या रेघा छोट्या करण्याचे कारण नाही. भाजप हा मूलत:च समाजाशी पूर्णत: जोडला गेलेला, तळागाळात रुजलेला अतिविशाल असा शुद्ध लोकशाहीवादी पक्ष आहे. भाजपचे नवे अध्यक्ष नड्डा यांना पार वेगळ्या वातावरणात राष्ट्रीय अध्यक्षाची जबाबदारी पेलावी लागणार आहे हे मात्र खरे. पक्षाची सूत्रे त्यांनी ज्यांच्या हातून स्वीकारली त्या अमित शहा यांच्या कारकीर्दीत भाजप अनेक पटींनी वाढला. इतकेच नव्हे तर सत्तेवर भक्कमपणे नियंत्रण ठेवणार्या पक्षात त्यांनी भाजपचे रूपांतर केले. त्यांच्या आधीच्या बहुतेक अध्यक्षांना विरोधकांचीच भूमिका बजावावी लागली होती. शहा यांच्या तोडीस तोड संघटना कौशल्य नड्डा यांच्याकडे आहे. व्यूहरचनात्मक चालींसंदर्भातही ते माहीर आहेत. भाजपच्या वाटचालीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांत त्यांचे योगदान राहिले आहे. काही दिवसांवर आलेली दिल्ली विधानसभेची निवडणूक आणि पाठोपाठ येणार्या पश्चिम बंगाल व केरळ येथील विधानसभा निवडणुका नड्डा यांच्या नेतृत्वाखाली भाजप लढेल. एकेकाळी हिमाचल प्रदेशात साधा कार्यकर्ता म्हणून नड्डा यांनी तेव्हाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महामंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले होते. स्कूटरवर डबलसीट फिरून पक्षकार्य करणारी ही जोडगोळी तेव्हा हिमाचल प्रदेशात प्रसिद्ध होती. क्रीडापटू नड्डा यांनी जलतरणाच्या आंतरराज्य स्पर्धेत बिहारचे प्रतिनिधित्व केले होते. तेव्हा तरंगणे आणि यशस्वीपणे शर्यती जिंकणे हे राजकारणाला आवश्यक असलेले गुण त्यांच्या ठायी पूर्वीपासूनच आहेत असे म्हणावे लागते.