पनवेल, कळंबोली : बातमीदार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ वाशी विभागाद्वारे या वर्षापासून अकरावीच्या वर्गासाठी नवीन आलेल्या आरोग्य, शारीरिक शिक्षण, पर्यावरण व जलसुरक्षा या विषयांची सुधारित मूल्यमापन योजनेसंदर्भात माहिती मिळावी यासाठी एकदिवसीय जिल्हास्तरीय शिक्षक प्रशिक्षणवर्गाचे नुकतेच सुएसोच्या कळंबोली येथील कनिष्ठ महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते. या वर्षापासून अकरावीसाठी आरोग्य व शारीरिक शिक्षण हे पाठ्यपुस्तक आले असून, पुढील वर्षापासून बारावीच्या वर्गासाठीही हे पाठ्यपुस्तक येणार आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील शिक्षकांना सविस्तर गुणदान पद्धत कळावी यासाठी उपस्थित शिक्षकांना राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक व मास्टर ट्रेनर प्रा. संभाजी बडे, प्रा. आदिनाथ गाडेकर यांनी नवीन अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिका आराखडा, प्रात्यक्षिक परीक्षा यावर मार्गदर्शन केले, तसेच पर्यावरणसंबंधी प्रा. रामदास वाघ, प्रा. रणदिवे यांनी माहिती दिली. या उपक्रमास सुएसोचे सचिव रवींद्र घोसाळकर, उपशिक्षणाधिकारी कोकाटे, विभागीय शिक्षण मंडळाचे महेश क्षीराव, विलास पाटील, प्राचार्य राजेंद्र पालवे, उपप्राचार्य बी. डी. कसबे, सरोज पाटील, अधीक्षक दत्ता शिंदे, एस. बी. शिंदे आदी उपस्थित होते. प्रशिक्षणासाठी रायगडातून 147 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. उपस्थित प्रशिक्षणार्थींना पीपीटीच्या माध्यमातून प्रोजेक्टरवर माहिती देण्यात आली.