कापणीची लगबग सुरु; पावसाचे सावट कायम
रोहे ः महादेव सरसंबे
यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने रोहे तालुक्यात भातशेती बहरली आहे. बळीराजाचे पिवळे सोने तयार झाले असून, तालुक्यात काही ठिकाणी कापणीला सुरुवात झाली आहे. मात्र परतीच्या पावसाचे सावट असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. तालुक्यात यंदा काही प्रमाणात भातशेती क्षेत्र वाढले आहे.
रोहे तालुक्यात भातशेती लागवडीसाठी 10800 हेक्टर योग्य जमीन आहे. गेल्यावर्षी 8430 हेक्टरवर भातशेतीची लागवड झाली होती. यंदा 8568 हेक्टर क्षेत्रात भातशेती लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यात यावर्षी 138 हेक्टर भातशेती क्षेत्र वाढले आहे. तालुक्यात यावर्षी प्रामुख्याने जया, रत्ना, कोमल, रूपाली आदीसह अन्य जातीच्या बियाण्याची लागवड करण्यात आली आहे. पारंपरिक लागवडीसह चारसूत्री, एसआरटी पद्धतीने भातशेतीची लागवड केली आहे. पावसाने उशीरा सुरुवात केल्यानंतरसुद्धा समाधानकारक पाऊस झाला आहे. सध्या तालुक्यातील कोलाड, नागोठणे, खांब, धाटाव, चणेरे, मेढा, यशवंतखार, घोसाळे, भालगाव, पिंगळसई, देवकाने या विभागामधील भात शेती चांगलीच बहरली आहे. यावर्षी चांगले उत्पादन निघण्याची शक्यता असल्यामुळे बळीराजा खुशीत आहे.
तालुक्याच्या काही भागात भातपिकांची कापणी सुरु झाली असून, गेल्या वर्षी हेक्टरी 29 क्विंटल उत्पादन निघाले होते. यावर्षी चांगले पीक असल्याने हेक्टरी 32 क्विंटल उत्पादन निघण्याची शक्यता आहे.
-महादेव करे, कृषी अधिकारी, रोहे