पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडवर शानदार विजय
ऑकलंड : वृत्तसंस्था
सलामीवीर लोकेश राहुलचे अर्धशतक आणि त्याला कर्णधार विराट कोहलीने दिलेली उत्तम साथ या जोरावर भारताने पहिल्या टी-20 सामन्यात विजयाची नोंद केली आहे. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले 204 धावांचे आव्हान भारताने 6 गडी राखत पूर्ण केले. राहुलने या सामन्यात 56, तर कोहलीने 45 धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरनेही अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करीत नाबाद 52 धावा केल्या. पहिल्या सामन्यातील विजयासह भारताने मालिकेत 1-0 ने आघाडीही घेतली आहे.
भारतीय डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला. यानंतर राहुल आणि कर्णधार कोहली यांनी संयमी भागीदारी करीत संघाचा डाव सावरला. यादरम्यान राहुलने आपले अर्धशतकही साजरे केले. 56 धावांवर राहुल इश सोधीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहलीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र मोक्याच्या षटकांमध्ये विराट बाद झाला. यानंतर श्रेयस अय्यर आणि मनीष पांडे यांनी अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करीत संघाला विजय मिळवून दिला.
त्याआधी, कर्णधार केन विल्यमसन आणि सलामीवीर कॉलिन मुनरो आणि अनुभवी रॉस टेलर यांनी झळकावलेल्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात 203 धावांपर्यंत मजल मारली. घरचा हंगाम गाजवल्यानंतर न्यूझीलंडच्या मैदानावर भारतीय गोलंदाजांचा खर्या अर्थाने कस लागला, मात्र मधल्या सत्रात भारतीय गोलंदाजांनीही दमदार पुनरागमन केले. मुनरोने 59, टेलरने नाबाद 54, तर विल्यमसनने 51 धावांची खेळी केली. भारताकडून जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.