
कर्जत : प्रतिनिधी
नगर परिषद हद्दीतील अनेक रस्त्यांच्या कामाचा ठेका घेतलेला ठेकेदार एका रस्त्याचे काम सोडून दुसर्या ठिकाणी काम करत असल्याने रस्त्यावरील किरकोळ कामे अर्धवट अवस्थेत तशीच राहिली होती. त्याने शहरातील कन्याशाळेसमोरील रस्त्याच्या पट्ट्यातील एक साईटमध्ये पेव्हर ब्लॉक बसवले तर दुसरी बाजू तशीच सोडली होती, त्यामुळे या ठिकाणी काही वाहनांची ठोकर लागून अपघातही होते. याबाबतचे वृत्त बुधवारी (दि. 22) ‘दै. रामप्रहर‘मध्ये प्रसिद्ध होताच खडबडून जाग आलेल्या ठेकेदाराने कन्या शाळेसमोरील रस्त्यावरील तो पट्टा पेव्हर ब्लॉकने भरण्यास सुरुवात केली आणि गुरूवारी (दि. 23) ते काम पूर्णही केले.
कर्जत नगरपरिषद हद्दीतील अनेक रस्त्याच्या कामाचा ठेका घेतलेला ठेकेदार रस्त्याच्या कामे करताना मनमानी कारभार करताना दिसत आहे. शहरातील स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब राऊत चौक ते अभिनव ज्ञान मंदिर मार्गे मुरबाड हायवेला मिळणार्या रस्त्यावर कन्याशाळेसमोरील पट्टा अनेक दिवस तसाच सोडला होता. संबंधित ठेकेदाराने या पट्ट्यातील एक साईटमध्ये पेव्हर ब्लॉक बसवले तर दुसरी बाजू तशीच सोडली होती. त्यामुळे अनेक दुचाकीधारक व इतर वाहने रस्त्यातील खड्यातून आपले वाहन घेऊन न जाता अर्धवट भरलेल्या पट्ट्यावरूनच आपली वाहने घेऊन जात असल्यामुळे काही वाहनांच्या समोरासमोर ठोकर होऊन अपघात होत होते. त्या पट्ट्यात पेव्हर ब्लॉक लावण्याच्या किंवा अन्य उपाय योजना करण्याच्या सूचना ठेकेदाराला द्याव्यात, अशी मागणी विठ्ठलनगरमधील रहिवासी प्रभाकर गंगावणे यांनी नगरपरिषदेकडे केली होती. त्याचे वृत्त बुधवारी ‘दै. रामप्रहर‘मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर स्थानिक नगरसेविका संचिता पाटील यांनी त्याच दिवशी संबंधित ठेकेदाराला उरलेल्या पट्ट्यात पेव्हर ब्लॉक बसण्याबाबत सूचना दिल्या. संबंधित ठेकेदाराने पट्ट्यात पेव्हर ब्लॉक बसविले आहेत.