Breaking News

आदिवासींचे उपोषण यशस्वी

कशेळे ग्रामीण रुग्णालयात सुविधा पुरविण्याचे आश्वासन

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील कशेळे ग्रामीण रुग्णालयात अनेक सुविधांची वानवा असून, त्यांची पुर्तता करावी, या मागणीसाठी आदिवासी समाजाच्या कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर हे उपोषण स्थगीत करण्यात आले. शंभरच्या पुढे ओपीडीचा आकडा असलेल्या कशेळे ग्रामीण रुग्णालयात गट अ पासून ड पर्यंत एकूण स्थायी व अस्थायी अशी 27 पदे मंजूर आहेत. मात्र त्यापैकी वैद्यकीय अधीक्षकसह डॉक्टरांची पाच पदे रिक्त आहेत. तर मंजूर पदांमधून काही रजेवर आहेत. कर्मचार्‍यांची रिक्त पदे भरावीत, तसेच या ग्रामीण रुग्णालयात अनेक वर्षे रुग्णांना भेडसावणार्‍या समस्या सुटाव्यात याकरिता कर्जत तालुका आदिवासी समाज संघटना गेल्या अनेक महिन्यांपासून पाठपुरावा करीत आहे. मात्र  जिल्हा शल्य चिकित्सकांच्याकडून त्या समस्या सुटत नसल्याने आदिवासी समाजाचे कार्यकर्ते जैतु पारधी आणि परशुराम थोराड यांनी 26 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरु केले होते. दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यावेळी कर्जत येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय धनेगावे यांची कशेळे येथे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गवळी यांनी उपोषणकर्त्यांना सांगितले. तसेच रुग्णालयातील अन्य समस्या सोडविण्याबाबत लेखी आश्वासन दिले. त्यामुळे जैतु पारधी आणि परशुराम थोराड यांनी उपोषण स्थगित केले. या वेळी तालुका आरोग्य अधिकारी सी. के. मोरे, डॉ. संजय धनेगावे, सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र राणे यांच्यासह आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

Check Also

‘गीतगंधाली’तून उलगडला कर्मवीर अण्णांचा जीवनपट

सातारा येथील कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती सातारा : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त कर्मवीर …

Leave a Reply