Sunday , February 5 2023
Breaking News

अवैध अग्निशस्त्र बाळगणारा उरणच्या नवघरमध्ये जेरबंद

उरण : प्रतिनिधी
बेकायदेशीरपणे अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने उरण तालुक्यातील नवघर येथून सापळा रचून जेरबंद केले आहे. त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसेही पोलिसांनी हस्तगत केली आहेत.
राजेशकुमार रामफेर बिंद (वय, 45, रा. वडाळा, मुंबई, मूळ रहिवासी आनापूर, जि. जौनपूर, उत्तरप्रदेश) असे या आरोपीचे नाव असून, तो ट्रकचालक आहे. नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाला उरण तालुक्यातील नवघर येथे एक इसम बेकायदेशीर अग्निशस्त्र घेऊन विक्री करण्यासाठी येत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार नवी मुंबई मध्यवर्ती गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपीकडे मिळालेल्या एका पिस्तूलच्या बॅरलवर ’मेड इन जपान’ व दुसर्‍या पिस्तूलवर ’मेड इन यूएसए’ असे इंग्रजी अक्षरात कोरलेले आहे. या पिस्तुलांसह सहा जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. या प्रकरणी आरोपीविरुद्ध उरण पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25 सह मुंबई पोलीस कायदा कलम 37 (1),135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीस तत्काळ अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता, पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ही अग्निशस्त्रे व काडतुसे त्याने कोठून व कशासाठी आणली आहेत, याचा तपास नवी मुंबई मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक राणी काळे करीत आहेत.

Check Also

कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल …

Leave a Reply