उरण : प्रतिनिधी
जागतिक किर्तीच्या घारापुरी बेटाच्या स्वच्छतेसाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ओएनजीसी अधिकार्यांनी सीएसआर फंडातून 15 लाख 45 हजार 803 रुपये निधीतून घंटा गाडी आणि 500 कचरा कुंड्या बेटावर दाखल झाल्या आहेत. क्रेन, हायड्राचा वापर करून अखेर बोटीने समुद्रापार करीत मोठ्या प्रयासाने स्वच्छतेची सामुग्री बेटावर
पोहचविण्यात यश आले आहे.
जागतिक किर्तीच्या घारापुरी बेटावरील अदभुत अति प्राचिन कोरीव लेण्यांमुळे बेटाला जागतिक वारसा लाभला आहे.शिवकालीन लेण्या पाहण्यासाठी जगभरातून दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक बेटावर हजेरी लावतात. मात्र जागतिक प्रसिध्दीच्या झोतात असलेल्या घारापुरी बेटाला चारही बाजुने समुद्राने वेढले आहे. बेटासभोवार समुद्र असल्याने समुद्रातून मोठ्या प्रमाणात कचरा वाहून येतो. विविध प्रकारच्या येणार्या कचर्यामुळे बेटावरील किनारे अगदी भरुन जात आहेत. मात्र बेटाच्या सभोवार येणार्या कचर्याची स्वच्छता करण्यासाठी घारापुरी ग्रामपंचायतीकडे ना निधी, ना कोणतीही शासकीय योजना उपलब्ध नाही. त्यामुळे समुद्रातून मोठ्या प्रमाणात येणारा कचरा समुद्र किनार्यावरच साठुन राहात आहे. अशा या किनार्यावरच साठून राहाणार्या कचर्यामुळे मात्र जागतिक किर्तीच्या बेटाचे विद्रुपीकरण होत आहे. हे विद्रुपीकरण बेटावर येणार्या
देशी-विदेशी पर्यटकांच्या दृष्टीस पडत असल्याने बेटाच्या किर्तीलाही बाधा निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे बेटाच्या आणि लेणी परिसराच्या स्वच्छतेसाठी कचरा गाडी, कचराकुंड्यासाठी निधी देण्यात यावा असा प्रस्ताव घारापुरी ग्रामपंचायतीने उरण पंचायत समितीच्या सहकार्याने घारापुरीचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी उरण ओएनजीसी प्रकल्पाचे मुख्य प्रबंधक नरेंद्र नसीजा याच्यांकडे सादर केला होता.
ओएनजीसीने घारापुरी ग्रामपंचायतीच्या मागणी प्रस्तावाला मान्यता देत सीएसआर फंडातून 15 लाख 45 हजार 803 रुपये निधी मंजूर केला. घारापुरी बेटाच्या स्वच्छतेसाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ओएनजीसीने मंजूर केलेल्या निधीतून एक अद्ययावत घंटा गाडी आणि 500 कचरा कुंड्या सुपुर्द केल्या आहेत. या वेळी लोकप्रतिनिधी व स्थानिक उपस्थित होते.