पनवेल : प्रतिनिधी
नवीन पनवेल रेल्वे स्टेशन जवळील रस्त्यावरील झाडांची गुरुवारी (दि. 30) रात्री अज्ञात व्यक्तीनी कटरने अमानुष कत्तल केल्याबद्दल अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी संताप व्यक्त करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
नवीन पनवेल सेक्टर 15 मधील विचुंबे रस्त्यावरील प्रजापती बिल्डिंगच्यासमोर पदपथावर दोन वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या पिंपळ, बदाम आणि इतर झाडांची वाढ चांगली झाली होती. तेथून जाणार्याला आणि रिक्षावाल्यांना त्या झाडांच्या सावलीमुळे गारवा मिळत होता. गुरुवारी रात्री अज्ञात व्यक्तीनी कटरने ही झाडे तोडून टाकली. दहा फुटा पेक्षा उंच वाढालेल्या या झाडांमुळे स्टेशन परिसरातील जाहिरातीचे फलक व्यवस्थित दिसत नव्हते. त्यामुळे त्यासाठी ही झाडे तोडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मागील वर्षी ही या प्रकारे झाडे तोडण्यात आली होती. संघाचे अध्यक्ष प्रकाश विचारे, सचिव साहेबराव जाधव, डी. जी. मगरे, हेमंत नेहते, काशीनाथ भोईर, गोपाळ रेडकर आणि ईश्वरदास थुल यांनी सिडकोच्या अधिकार्यांनी सीसीटीव्हीचा वापर करून झाडे तोडणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.