Breaking News

न्यूझीलंडविरुद्ध आज दुसरी वन-डे : भारतासाठी ‘करो या मरो’

ऑकलंड : वृत्तसंस्था

न्यूझीलंडविरुद्ध हॅमिल्टन येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात 347 धावांचा डोंगर उभारूनदेखील पराभव झाल्याने भारतीय संघाला झटका बसला. टी-20 मालिकेत 5-0ने धमाकेदार विजय मिळवणार्‍या भारतीय संघाला हा पराभव पचनी न पडणारा होता. आता तीन सामन्यांच्या वनडेत शनिवारी (दि. 8) होणारी लढत टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ अशी आहे.

पहिल्या वनडेत भारताच्या पराभवाला जबाबादार ठरली ती बेशिस्त गोलंदाजी. पहिल्या वनडेत दोन्ही संघातील फलंदाजांनी त्यांची जबाबदारी चोख बजावली होती. त्यामुळे दुसर्‍या वनडेत गोलंदाज कशी कामगिरी करतात त्यावर विजय निश्चित होईल. ऑकलंड येथील ईडन पार्कवर गोलंदाजांचा दबदबा राहिला आहे. या मैदानावर न्यूझीलंडचा जलद गोलंदाज ख्रिस केन्स सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याने 27 सामन्यांत 33 विकेट घेतल्या आहेत. भारताचा विचार केल्यास जवागल श्रीनाधने या मैदानावर चार सामन्यांत 12 गडी बाद केलेले आहेत, तर ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने 28 धावा देत 6 विकेट घेतल्या होत्या.

पहिल्या वनडेतील पराभवानंतर भारतीय संघात बदल अपेक्षित आहेत. टी-20 मालिकेत चांगली कामगिरी करणार्‍या शार्दुल ठाकूरला नवदीप सैनीच्या जागी संधी मिळाली, पण तो महागडा ठरला. त्याने पहिल्या वनडेत नऊ षटकांमध्ये 80 धावा दिल्या. त्यामुळे दुसर्‍या वनडे सैनीला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे.

ईडन पार्कवर जलद गोलंदाजांना अधिक वाव असल्यामुळे भारतीय संघ जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी या तिघांशिवाय आणखी एका जलद गोलंदाजाला संधी देऊ शकतो. यात शार्दुल आणि शिवम दुबे यांच्यापैकी एकाचा विचार करावा लागले. संघ व्यवस्थापन मुंबईचा अष्टपैलू शिवमला संधी देऊ शकतो; कारण तो गोलंदाजीसोबत फलंदाजीदेखील करू शकतो. कुलदीप यादवने पहिल्या सामन्यात 10 षटकांत 84 धावा दिल्या होत्या. त्यामुळे त्याच्याऐवजी शिवमला स्थान मिळू शकते.

उंच ‘किवी’ला संधी

दुसर्‍या सामन्याच्या पूर्वसंध्येला न्यूझीलंडचा गोलंदाज स्कॉट कुग्गेलेइजन आजारी पडला आणि त्याने या सामन्यातून माघार घेतली आहे. त्याच्या जागी न्यूझीलंड संघाने त्यांच्या सर्वात उंच गोलंदाजाला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. 6.8 फुटांचा कायले जॅमिसन हा गोलंदाज आंतरराष्ट्रीय वन डे सामन्यात पदार्पण करणार आहे.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply