पनवेल : वार्ताहर
बारामती येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय सायकल रोड रे स्पर्धेत सीबीडी-बेलापूर येथील भारती विद्यापीठ प्रशालेची विद्यार्थिनी श्रेयसी कांचन कोठेकर हिने तृतीय क्रमांक मिळविला आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे, स्पोर्ट्स अकॅडमी बारामती, बारामती सायकल क्लब, बारामती ती सायकलिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या तांत्रिक सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
श्रेयसी ही 16 वर्षाखालील असूनदेखील तिने 19 वर्षाखालील म्हणजे मोठ्या गटात यश संपादन केले. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचे कोचिंग न घेता पालकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे श्रेयसीने हे यश मिळविले आहे. या यशाबद्दल श्रेयसीसह तिची आई शिक्षण प्रसारक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता कांचन कोठेकर आणि वडील कांचन कोठेकर यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
महाराष्ट्र राज्य सायकलिंग कोच वीरू भोजने यांनी श्रेयसीचे कौतुक केले आणि तिला पुढे मार्गदर्शन करण्याची तयारी दर्शवली आहे, तर या यशाबद्दल भारती विद्यापीठ प्रशालेच्या मुख्याध्यापिका कासारे आणि क्रीडा शिक्षक तानाजी सिनलकर यांनीही श्रेयसीचे कौतुक केले.