Breaking News

रायगडातील विधानसभांच्या जागांवर कोणतीही तडजोड नाही

काँग्रेस नेते माणिकराव जगतापांचा आघाडीला इशारा

अलिबाग : प्रतिनिधी

रायगडातील काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना मदत करेल, पण पुढे जाऊन रायगडातील विधानसभांच्या जागांवर मात्र काँग्रेस कोणतीही तडजोड करणार नाही. आमच्या जागा आम्ही लढवणारच, अशी रोखठोक भूमिका काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष माणिकराव जगताप यांनी मांडली आहे. त्याच वेळी रायगड लोकसभेच्या जागेवर आजही आमचा दावा कायम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलिबागेतील अंतुले भवनमध्ये रायगडातील काँगे्रसच्या पदाधिकार्‍यांची विशेष बैठक शनिवारी (दि. 9) बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. माजी आमदार मधुकर ठाकूर, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर, अ‍ॅड. जे. टी.पाटील, अलिबाग तालुकाध्यक्ष योगेश मगर, लांबे सोबत होते.

लोकसभा निवडणुकीची समीकरणे विधानसभेला लावण्याचा प्रयत्न झाल्यास तो आम्हाला मान्य नाही. विधानसभेला रायगडातील काँग्रेसचे अस्तित्व टिकवण्याच्या दृष्टीने आमच्या जागा आम्ही लढवणारच, त्यात तडजोड नाही. याबाबत प्रदेशाध्यक्षांना विनंती करण्यात आली असून, त्यात पुढे जाऊन जर दिल्लीत महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांना आमचे शिष्टमंडळ भेटेल, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची भेट घेऊन त्यांना रायगडातील वस्तुस्थिती समजावून सांगेन, असेही त्यांनी सांगितले. कोणाला मदत करत असताना स्वतःला संपविणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

आमचा उमेदवार प्रदेशाध्यक्ष ठरवतात

आघाडीच्या माध्यातून अलिबागची जागा जर काँग्रेसला सोडायची वेळ आली, तर ती आम्ही नक्की सोडू, असे वक्तव्य शेकाप आमदार जयंत पाटील यांनी केले होते. यावर बोलताना तो त्यांचा वैयक्तिक विचार आहे. काँग्रेसचा उमेदवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष किंवा देशाचे अध्यक्ष ठरवितात. अन्य कोणी ठरवू शकत नाही. त्यामुळे जयंत पाटील यांचे वक्तव्य गंभीरपणे घेण्यात काही अर्थ नाही, असेही माणिकराव जगताप यांनी या वेळी स्पष्ट केले.

रायगड लोकसभा मतदारसंघावर आमचाच दावा

मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली, परंतु सुनील तटकरे पराभूत झाले. त्यामुळे येथे राष्ट्रवादीचा दावा होऊ शकत नाही. आम्ही आजही रायगडच्या जागेवर दावा सांगत आहोत. रायगड किंवा मावळ आम्हाला द्या. आमच्याकडे उमेदवार आहेत असा आग्रह आम्ही पक्षश्रेष्ठींकडे धरला असल्याचे माणिक जगताप यांनी सांगितले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply