दुबई : प्रतिनिधी
दक्षिण आफ्रिकेत झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशने भारतावर मात करीत विजेतेपद पटकाविले, मात्र या सामन्यानंतर जल्लोष करताना बांगलादेशी आणि भारतीय खेळाडूंमध्ये वाद झाला. पंचांनी वेळेतच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला, पण या राड्यामुळे बांगलादेशच्या विजयाला गालबोट लागले. अखेरीस आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) या प्रकरणात व्हिडीओ फुटेज तपासत पाच खेळाडूंवर कारवाई केली आहे.
बांगलादेशकडून मोहम्मद तौहीद, शमिम हुसैन आणि रकीब-उल-हसन, तर भारताकडून आकाश सिंह आणि रवी बिश्नोई यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे. पाच खेळाडू आणि संघाचे स्टाफ यांना आयसीसीच्या आचारसंहितेच्या लेव्हल 3चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. या सर्वांवर कलम 2.21, तर रवी बिश्नोईवर कलम 2.5 नुसार आरोप लावण्यात आले आहेत. या सर्व खेळाडू आणि स्टाफने त्यांची शिक्षा स्वीकारल्याचे आयसीसीने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
भारतीय खेळाडू आकाश सिंहला आठ निलंबन गुण आणि 6 नकारात्मक गुण दिले गेले आहेत. बिश्नोईला 5 निलंबन गुण व 5 नकारात्मक गुण दिले आहेत. बिश्नोईला सामन्यातील 25व्या षटकात दासला बाद केल्यानंतर केलेल्या जल्लोषाबद्दल शिक्षा सुनावली आहे. बांगलादेशच्या तौहीदला 10 निलंबन गुण आणि 6 नकारात्मक, शमीमला आठ निलंबन गुण तर हसनला 5 निलंबन गुण आणि 5 नकारात्मक गुण दिले आहेत. हे नकारात्मक गुण आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी देखील लागू होणार आहेत. एक निलंबन गुण म्हणजे एक वनडे, टी-20 अथवा 19 वर्षांखालील अ संघातून आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यास बंदी असते.