Breaking News

व्हाईटवॉशचा बदला व्हाईटवॉशने! भारताविरुद्धची वनडे मालिका न्यूझीलंडने 3-0ने जिंकली

माउंट माँगनुई : वृत्तसंस्था

पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताने दिलेल्या व्हाईटवॉशचा बदला न्यूझीलंडने वनडे मालिकेत व्हाईटवॉशने घेतला. तिसर्‍या आणि अखेरच्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने पाच विकेट्सने विजय मिळवत मालिका 3-0ने जिंकली. भारताने विजयासाठी दिलेले 297 धावांचे आव्हान न्यूझीलंडने 17 चेंडू राखून पार केले. न्यूझीलंडचा हेन्री निकोल्सला सामनावीर, तर रॉस टेलरला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.

भारताने के. एल. राहुलच्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करत 296 धावा केल्या होत्या. विजयासाठी 297 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडला मार्टिन गप्टिल आणि हेन्नी निकोल्स यांनी शानदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. गप्टिल 66 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या कर्णधार केन विल्यम्सनला चहलने 22 धावांवर बाद केले, पण तोपर्यंत न्यूझीलंडने सामन्यावर पकड मिळवली होती. निकोल्सने 80 धावा केल्या. त्याला शार्दुल ठाकूने बाद केले.

रवींद्र जडेजाने रॉस टेलरला 12 धावांवर बाद करून न्यूझीलंडची मोठी विकेट घेतली, पण टॉम लॅथम आणि कॉलिन डी ग्रँडहोम यांनी न्यूझीलंडला सहज विजय मिळवून दिला. लॅथमने नाबाद 32, तर कॉलिन नाबाद 58 धावा केल्या.

त्याआधी तिसर्‍या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय डावाची सुरूवात पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल यांनी केली, मात्र मयांक पुन्हा एकदा अपयशी ठरला. तो एक धाव करून बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीदेखील 9 धावांवर बाद झाला. दोन गडी बाद झाल्यानंतर पृथ्वी आणि श्रेयस अय्यर ही जोडी मैदानात होती. पृथ्वीने त्याच्या स्टाईलने आक्रमक खेळ सुरू केला, पण 40 धावांवर तो धावचीत झाला. पृथ्वी बाद झाला तेव्हा भारताची अवस्था 3 बाद 62 अशी होती. त्यानंतर अय्यर आणि के. एल. राहुल या जोडीने भारताचा डाव सावरला. या दोघांनी धावसंख्या वाढवली आणि संघाला सुस्थितीत नेले. या जोडीने चौथ्या विकेटसाठी 100 धावांची भागिदारी केली. अय्यर 62 धावांवर बाद झाला. अय्यर बाद झाल्यानंतर राहुलने वनडेमधील चौथे शतक पूर्ण केले. शतकी खेळीनंतर तो 112 धावांवर बाद झाला. त्याने 113 चेंडूंत 9 चौकार आणि 2 षटकारांसह 112 धावा केल्या. न्यूझीलंडकडून हमिश बेनेटने सर्वाधिक चार गडी बाद केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply