मुंबई : प्रतिनिधी
झारखंड संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनने सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेत सलग दुसरे शतक ठोकले. दिल्लीविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात भोपळाची फोडू न शकलेल्या इशानने पुढील दोन सामन्यातं खणखणीत शतक झळकावले. जम्मू-काश्मीर संघाविरुद्धच्या 55 चेंडूंवरील 100 धावांच्या खेळीनंतर इशानने मणिपूर संघाविरुद्ध 62 चेंडूंत 113 धावा चोपल्या. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या खेळीत त्याने 8 चौकार व 7 षटकार खेचले होते; तर मणिपूरविरुद्ध त्याने 12 चौकार व 5 षटकारांची आतषबाजी केली. या शतकासह त्याने एका विक्रमालाही गवसणी घातली. डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया), केव्हिन पीटरसन (इंग्लंड), ल्युक राईट्स (इंग्लंड), रिझा हेंड्रीक्स (द. आफ्रिका) आणि आणखी काही खेळाडूंच्या विक्रमाशी इशान किशानने बरोबरी केली. या सर्वांना आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सलग दोन शतके ठोकण्याचा पराक्रम केला होता. इशान अशी कामगिरी करणारा उन्मुक्त चंदनंतर दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे उन्मुक्त आणि इशान यांचा अद्याप वरिष्ठ राष्ट्रीय संघाकडून खेळण्याची संधी मिळालेली नाही. उन्मुक्तने 2013मध्ये अशी कामगिरी केली होती. दरम्यान, इशानच्या या फटकेबाजीच्या जोरावर झारखंडने 1 बाद 219 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात मणिपूरला 9 बाद 98 धावाच करता आल्या.