पनवेल : वार्ताहर
सिटीझन्स् युनिटी फोरम अर्थात कफ संस्थेने ज्या ठिकाणी वृक्षलागवड केली त्या फणसवाडी येथील आदिवासी महिलांना रोजगारही उपलब्ध करून दिला. त्यासाठी पेपर डिश बनवायचे मशिन फणसवाडी येथे बसवून दिले. पाले बुद्रुक गावचे सरपंच सचिन तांडेल यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
‘कफ’तर्फे पाले बुद्रुक येथील फणसवाडीत जुलैमध्ये वृक्षारोपण करण्यात आले होते. 260 एकरची जागा वनखात्याने कफ या संस्थेला त्रिसदस्य करार करून त्या ठिकाणी हरित क्रांती करण्यासाठी दिली आहे. या कामासाठी लागणारे मनुष्यबळ हे कफने तिकडच्याच स्थानिक लोकांना कामावर ठेवून उपलब्ध केले व त्यांना रोजगार मिळवून दिला आहे. मुळामध्ये वृक्षलागवडीची भावना अशी आहे की तेथील आदिवासी जमातिला रोजगार उपलब्ध व्हावा. त्यांना एकूणच समाजाच्या प्रवाहात आणून ठेवावे. त्यांचे नुसते आरोग्यच नव्हे; तर सर्व जीवन व आर्थिक स्तर उंचवावा असा आहे. तेथील महिलांना काही तरी उत्पन्नाचे साधन मिळावे, चूल व मूल या जुनाट संकल्पनेतून बाहेर येऊन पुरुषांच्या बरोबरीने काम करावे यासाठी त्या परिसरामध्ये दोन महिला गट स्थापन केलेले असून, त्यांना पेपर डिश व कागदी बॅग बनवण्याचे प्रशिक्षण देण्याचे ठरवले आहे. यापैकी कागदी डिश ट्रेनिंग त्यांना मिळालेले आहे.
महिला दिनाचे औचित्य साधून फणसवाडीत पेपर डिश बनवण्याची एक मशीन बसवून तेथील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आले. येत्या काळात येथे बरेच प्रकल्प उभे राहणार असून झाडांसोबत तेथील जनतेचाही विकास होणार आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन या क्षेत्राचा विकास घडवून आणावा, असे कफचे उपाध्यक्ष व फणस वाडी येथील उपक्रमाचे प्रकल्पप्रमुख अरुण भिसे यांनी आपल्या भाषणात सांगितले. या कार्यक्रमास कामोठे कफच्या रंजना सडोलीकर, तसेच पदाधिकारी व सदस्य, पनवेलमधील महिला वर्ग, ग्रामस्थ व आदिवासी बांधव-भगिनी उपस्थित होते.