काँग्रेसचे नेते व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ‘आप’च्या विजयानंतर नोंदवलेली प्रतिक्रिया तर हास्यास्पद म्हणावी लागेल. ‘खोटारडेपणा’ आणि ‘सत्या’च्या युद्धात सत्याचा विजय झाला असे ते म्हणाले. विशेष म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसला खाते देखील उघडता आलेले नाही. इतकेच नव्हे तर 70 पैकी त्यांच्या 63 उमेदवारांना डिपॉझिट देखील गमवावे लागले. स्वपक्षाच्या अशा दारूण पराभवानंतर खोटारडेपणाचा पराभव झाल्याची टीका ते करत असतील तर तो खोटारडेपणा कोणाचा हे आपसुकच स्पष्ट होते.
शिमगा संपला तरी त्याचे कवित्व उरते, अशा अर्थाची एक म्हण आहे. त्याचे प्रत्यंतर आता आपल्याला पुढील काही दिवस येत राहील. दिल्ली राज्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाच्या सरकारने दणदणीत विजय प्राप्त करत पुन्हा एकदा दिल्लीचे तख्त काबीज केले. 2015 साली झालेल्या निवडणुकीत ‘आप’ने 70 पैकी तब्बल 67 जागा जिंकून विक्रमी यश संपादले होते. यंदा देखील तशास नेत्रदीपक विजयाची पुनरावृत्ती करत मुख्यमंत्री केजरीवाल यांनी भरघोस यश मिळवले आहे. दिल्लीवासियांनी ‘आप’ सरकारच्या कामाला आणि आश्वासनांना सकारात्मक प्रतिसाद दिला हे मान्य करायला हवे. आम आदमी पक्षाचा विजय भव्य असला तरी यच्चयावत सारे विरोधक टाळ्या पिटू लागले आहेत ते वेगळ्याच कारणासाठी. आम आदमी पक्षाच्या विजयापेक्षा भारतीय जनता पक्षाचा पराभव त्यांना अधिक भव्य वाटू लागला आहे. भारतीय जनता पक्षाला दिल्लीवासियांनी नाकारले असा सूर काँग्रेससह अनेक विरोधीपक्षांनी लावला. ‘मन की बात’पेक्षा ‘जन की बात’ सरस ठरली अशा आशयाची प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. दिल्लीतील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने युद्धाआधीच शस्त्रे टाकून दिली होती हे जगजाहीर झाले होते. आता ते भाजपच्या पराभवात दिवाळी साजरी करत आहेत. महाराष्ट्रातील दोन प्रतिक्रियांची दखल घेणे इथे भाग आहे. जवळपास तीन दशके ज्यांच्या साथीने निवडणुका लढवल्या, सत्तेत वाटेकरी झालो, त्याच मित्रपक्षाला दूषणे देताना शिवसेनेच्या नेत्यांनी काही भान ठेवणे आवश्यक आहे. आपल्याला मिळालेली सत्ता ही जनादेशामुळे मिळालेली नसून कुटिल डावपेचांमुळे पदरात पडलेली आहे हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. भारतीय जनता पक्षाने दिल्लीची निवडणूक अत्यंत गांभीर्याने लढवली होती. तरीही हा पक्ष जागांची दोन आकडी संख्या गाठू शकला नाही हे वास्तव आहे. या पराभवाची मीमांसा पक्षशिस्तीनुसार यथावकाश होईलच. पराभवातून धडे घेत घेतच भारतीय जनता पक्ष आज सर्वात मोठा व बलशाली पक्ष बनला आहे. या निवडणुकीत दिल्लीमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळाले नसले तरी मतांच्या टक्केवारीतील वाढ काहिसा दिलासा देणारी आहे. दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाची जणू लाट आली होती, त्या लाटेतही भाजपने आपले आठ आमदार निवडून आणले आहेत. अन्य सारे पक्ष मात्र नेस्तनाबूत झाले. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या पराभवाला दारूण म्हणून हिणवण्याचे काहीही कारण नाही. निवडणुकांमध्ये हार-जीत होतच असते. ‘आप’च्या यशाची रेषा अधिक मोठी करण्यासाठी भाजपच्या माफक यशाची रेघ आणखी छोटी करण्याचे काही कारण नाही. प्रश्न दिल्लीच्या विकासाचा आहे. त्या कार्यासाठी आम आदमी पक्षाच्या सरकारला शुभेच्छा.