Breaking News

भारताच्या पराभवाची मालिका; महिलांचीही हार

मेलबर्न : वृत्तसंस्था
19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत युवा संघाचा बांगलादेशकडून पराभव…टी-20 मालिकेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिल्यानंतर याच संघाकडून वन डे मालिकेत भारताला व्हॉईटवॉश आणि हे कमी म्हणून की काय भारतीय महिलांचीही तिरंगी मालिकेतील फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून हार झाली. स्मृती मानधनाने दमदार फटकेबाजी करून तोंडाशी आणलेला विजयी घास ऑसी महिलांनी अखेर हिरावून नेला.
इंग्लंडचा पत्ता कट करून तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणार्‍या ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने भारतासमोर 156 धावांचे आव्हान ठेवले होते. बेथ मूनीची नाबाद अर्धशतकी खेळी आणि अखेरच्या षटकांत राचेल हायनेसने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 6 बाद 155 धावांचा समाधानकारक पल्ला गाठला. अखेरच्या तीन षटकांत मूनी आणि राचेल यांनी 41 धावा चोपून काढल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झाली. दीप्ती शर्माच्या पहिल्याच षटकात अ‍ॅलीसा हिली (4) माघारी परतली. त्यानंतर मूनी आणि अ‍ॅशलेघ गार्डनर यांनी दुसर्‍या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. अरुंधती रेड्डीने ही भागीदारी मोडली. तिने गार्डनरला (26) माघारी पाठवले. त्यानंतर आलेल्या कर्णधार मेन लॅगिंगने (26) तिसर्‍या विकेटसाठी मूनीसह अर्धशतकी भागीदारी केली.
लॅनिंग माघारी परतल्यानंतर ऑस्ट्रेलियाला सलग दोन धक्के बसले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया मोठा पल्ला गाठणार नाही असे वाटत होते. 17 षटकांत ऑस्ट्रेलियाच्या 114 धावा झाल्या होत्या, पण मूनी एका बाजूने खिंड लढवत होते. तिला हायनेसची साथ मिळाली. या दोघींनी 11 चेंडूंत 30 धावा चोपल्या. हायनेसने 7 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकार खेचून 18 धावा केल्या. मूनी 54 चेंडूंत 9 चौकारांसह 71 धावांवर नाबाद राहिली.
लक्ष्याचा पाठलाग करताना शेफाली वर्माने शानदार टोलेबाजी करून सकारात्मक सुरुवात केली, परंतु ती फार काळ खेळपट्टीवर टिकली नाही. दुसर्‍याच षटकात शेफाली (10) माघारी परतली. या सामन्यात जेमिमा रॉड्रीग्जच्या जागी रिचा घोषला बढती मिळाली. तिने तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीला येताना स्मृती मानधनासह 43 धावा जोडल्या. अ‍ॅनाबेल सदरलँडने ही भागीदारी संपुष्टात आणली. रिचा 17 धावांवर माघारी परतली. जेमिमाही अवघ्या दोन धावा करून टाल्या व्ह्लॅमिंकच्या गोलंदाजीवर माघारी परतली. व्ह्लॅमिंकची ही दुसरी विकेट ठरली. 10 षटकांत भारताचे तीन फलंदाज 69 धावांवर माघारी परतले होते.
स्मृतीने एक बाजू लावून धरताना अर्धशतक झळकावले. तिने 29 चेंडूंत 9 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. निकोला कॅरीने अप्रतिम झेल घेत स्मृतीला माघारी धाडले. स्मृती 37 चेंडूंत 12 चौकारांच्या मदतीने 66 धावा करून बाद झाली. कर्णधार हरमनप्रीत कौर (14) झटपट माघारी परतली. भारतासाठी हा मोठा धक्का होता. त्याच षटकात अरुंधती रेड्डी (0) लाही जेस जोनासेनने माघारी पाठवून टीम इंडियाला बॅकफूटवर टाकले. टीम इंडियाचे 4 फलंदाज 13 धावांत माघारी परतले. तानिया भाटियाने 19व्या षटकात फटकेबाजी करून टीम इंडियाचे आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न केला. टीम इंडियाला अखेरच्या षटकांत विजयासाठी 15 धावांची आवश्यकता होती, परंतु ऑसींच्या टिच्चून मार्‍यासमोर ते अपयशी ठरले. टीम इंडियाचा संपूर्ण संघ 144 धावांत गारद झाला.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply