पनवेल : वार्ताहर
पनवेल शहरातील कायदा- सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी व नागरिकांसह महिलावर्ग, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पनवेल शहर पोलीस ठाण्यांतर्गत विविध सेलची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे तक्रारदाराला आपली तक्रार देणे अधिक सोयीस्कर राहणार असल्याची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून महिलांवर होणारे अत्याचार, अन्याय हे प्रकार सर्वत्र वाढले आहेत. यासाठी शासनाने महिला अत्याचार प्रतिबंधक पथकाची स्थापना केली आहे. शासनाच्या ध्येय धोरणानुसार व नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या आदेशानुसार कम्युनिटी पोलिसिंगला आता सुरुवात झाली आहे. महिलांमध्ये सुरक्षेची भावना यावी, त्यांना विश्वास यावा, त्यांनी स्वतःहून पुढे येऊन आपल्या तक्रारी पोलिसांसमोर मांडव्यात, त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तसेच त्यांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी महिला अत्याचार प्रतिबंधक पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्या महिला, तरुणी आयटी क्षेत्रात काम करतात त्यांना रात्री-अपरात्री घरी किंवा कामावर जावे लागते. अशा महिलांनी पोलिसांची मदत घेतल्यास बॉडी कॉप नावाचे मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यात त्यांना सुरक्षितपणे ये-जा करता येईल. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी अधिक माहिती दिली.