खारघर : प्रतिनिधी
14 फेब्रुवारी हा दिवस पाश्चात्य संस्कृतीनुसार जगभरात ’वेलेन्टाईन डे’च्या रूपाने प्रेमाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. खारघर मधील शाश्वत फाऊंडेशन व अखिल भारतीय कच्छ कडवा पाटीदार युवा संघ या सामाजिक संस्थांनी पाश्चात्य संस्कृतीच्या आक्रमणाला आळा घालत भारतीय परंपरेनुसार 14 फेब्रुवारी हा दिवस ’मातृ-पितृ पूजन दिवस’ म्हणून साजरा केला. कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांचे पारंपरिक पद्धतीने पूजन करून त्यांना प्रेमाचे प्रतीक म्हणून भेटवस्तू देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात 150 हून अधिक ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती. शाश्वत फाऊंडेशनच्या अध्यक्षा बीना गोगरींनी सर्वांचे स्वागत केले व कार्यक्रमाचे उद्देश्य स्पष्ट केले. कार्यक्रमात पुलवामा आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरएसएफच्या वीर जवानांना श्रद्धांजली ही वाहण्यात आली. ह्या कार्यक्रमाला सेवानिवृत्त फौजी ज्येष्ठ नागरिकांची देखील उपस्थिती लाभली होती. अन्जु आर्या यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार प्रदर्शन करत कार्यक्रमाची सांगता केली.