प्रकल्पांचे अधिकारीच उरणमध्ये राहत नाहीत; प्रशासनाची सारवासारव
उरण : प्रतिनिधी
सोमवारी उरणच्या ओएनजीसी प्रकल्पात इलेक्ट्रॉनिक कामाच्या ठिकाणी झालेल्या भीषण स्फोटाच्या प्रकाराने उरण तालुक्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी याच प्रकल्पात भीषण आग लागून त्यात एका स्थानिकाला जीव गमवावा लागला होता. त्या वेळी स्थानिकांनी केलेल्या आंदोलनाच्या निमित्ताने प्रकल्पाचा कोणीही मुख्य अधिकारी प्रकल्पाच्या ठिकाणी राहत नसल्याचा मुद्दा समोर आला होता. त्यावर ओएनजीसीच्या प्रशासनाने काहीशी सारवासारव केली होती. त्यानंतर आता पुन्हा परवाच्या स्फोटानंतर पुन्हा एकदा तोच मुद्दा पुढे आला असून, तालुक्यातील बहुतांशी प्रकल्पाचे मुख्य अधिकारी या ठिकाणी राहतच नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले असल्याने एकूणच तालुक्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आशिया खंडातील सर्वाधिक प्रकल्पाचा तालुका म्हणून उरण तालुक्याला ओळखले जात आहे. ओएनजीसी, जेएनपीटी बंदर, बीपीसीएल, नेव्हल शस्त्रागार असे अनेक केंद्र सरकारचे महत्त्वाचे प्रकल्प या ठिकाणी वसले आहेत, तर आयएमसी, गणेश बेंजोप्लास्ट, आयओटीएल, रिलायन्स, बीपीसीएल, जीटीपीएस आदी अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प तालुक्यात वसले आहेत. यातील अनेक प्रकल्पांमध्ये यापूर्वीही अनेकदा छोटे मोठे अपघात घडले आहेत. यातील ओएनजीसी प्रकल्पात तर वरचेवर नियमित छोटे-मोठे अपघात घडतच असतात. असाच अपघात सोमवारी घडून त्यात एक कामगार गंभीररित्या जखमी झाल्याचा विषय आता समोर आला असून, यातून पुन्हा एकदा उरण तालुक्याच्या सुरक्षिततेचा विषय चर्चेला आला आहे.
तालुक्यातील नेव्हल शस्त्रागार वगळता कोणत्याही प्रकल्पाचे प्रमुख अधिकारी या ठिकाणी राहत नसल्याने कोणत्याही प्रकल्पात कोणताही अपघात वगैरे घडल्यास त्याचे मुख्य अधिकारी या ठिकाणी पोहोचायलाच किमान तीन ते चार तासांचा कालावधी जात असल्याने अपघात घडल्यावर स्थानिक तालुका प्रशासनाची मात्र तारांबळच उडत आहे. महत्त्वाच्या प्रकल्पाच्या मुख्य अधिकारी वर्गाने प्रकल्पापासून फक्त तीन ते पाच किमीच्या अंतरावरच राहणे बंधनकारक आहे, मात्र त्याची अंमलबजावणी करणे ज्यांच्या हाती आहे त्यापैकी कोणीही त्याबाबत गंभीर नसल्याने उरण तालुक्यातील अनेक अतिधोकादायक प्रकल्पाचे अधिकारी, पनवेल, वाशी, मुंबई, ठाणे आदी ठिकाणी राहायला असल्याने एखाद्या अपघाताने उरण तालुक्याचा जरी कोळसा झाला, तरी त्याची झळ या कोणत्याही अधिकारी वर्गाला बसत नसल्याने यापैकी कोणीही अधिकारी उरण तालुक्याच्या सुरक्षिततेच्या विषयावर गंभीर नाहीत हे समोर आले आहे. तालुक्याच्या प्रमुख प्रशासकीय अधिकारी वर्गाला सुद्धा उरणमध्ये वास्तव्याला राहण्याची गरज वाटत नाही केवळ पोलीस अधिकारी वगळता कोणीही या ठिकाणी राहत नसल्याने तालुक्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न मात्र गंभीर बनत चालला आहे.