Breaking News

महागड्या गाड्यांचा अपहार करणार्यास बेड्या

पनवेल ः वार्ताहर : एखाद्या इसमास गाडी विकायची असल्यास अपेक्षेपेक्षा जास्त किंमत मिळवून देतो, असे सांगून सदर गाडी कमी किमतीत दुसर्‍या व्यक्तीस विकून त्याचे पैसे मूळ मालकाला न देता त्या पैशांचा अपहार करणार्‍या सराईत गुन्हेगारास तळोजा पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याच्याकडून 35 लाख 90 हजार रुपयांच्या 12 गाड्याही हस्तगत करण्यात आल्या आहेत.

शोएब काझी (44, रा. तळोजा फेज-1) असे सराईत गुन्हेगाराचे नाव असून त्याने विविध ठिकाणांवरून वेेगवेगळ्या कंपन्यांच्या गाड्या खरेदी-विक्रीसाठी स्वतःच्या ताब्यात घेतल्या, परंतु त्या गाड्यांच्या विक्रीनंतर मूळ मालकास सदर गाडीचे पैसेही दिले नाहीत. त्याचप्रमाणे काही नागरिकांकडून लाखो रुपये घेऊन गुंतवणूक करून दर महिन्याला नफ्यासह परतावा देतो, असे सांगून फसवणूक केली होती.

या इसमाविरुद्ध यापूर्वीही मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तळोजा परिसरातील नागरिकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सहा. पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली तळोजा पोलीस ठाण्याचे वपोनि. काशिनाथ चव्हाण यांनी विशेष पथक स्थापन केले. सपोनि. गणपत परचाके, सुधीर निकम, पो. हवा. बाबाजी थोरात, पो. ना. वैभव शिंदे, महेंद्र होनवार, सचिन पवार, उमेश पाटील, संतोष ठाकूर आदींच्या पथकाने गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीआधारे आरोपीला शिवडी, मुंबई येथून ताब्यात घेतले. त्याने आतापर्यंत अपहार केलेल्या 12 गाड्या पोलिसांच्या ताब्यात दिल्या आाहेत.

नागरिकांनी अधिक नफ्यासाठी कोणतीही पूर्ण माहिती न घेता ऑनलाइन व्यक्तींबरोबर व्यवहार करू नये. दोन पैसे कमी मिळाले तरी खात्रीशीर व्यक्तींद्वारेच गाड्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करावा. या गुन्ह्यातील आठ गाड्यांच्या मालकांची ओळख पटायची असून त्यांनी यासंदर्भात तळोजा पोलिसांशी संपर्क साधावा. -रवींद्र गिड्डे, स. पो. आयुक्त

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply