पनवेल ः प्रतिनिधी : पनवेलसह तालुक्यातील इतर ठिकाणी विखुरलेले तेली समाज बांधव एकत्र येऊन पनवेलमधील तेली नाका येथील शनी मंदिरात जय संताजी तेली समाज मंडळ पनवेल, पनवेल तेली समाज युवा विचार मंच, जिजाऊ महिला मंडळ पनवेल यांच्या वतीने स्नेहसमारंभ उत्साहात पार पडला. या वेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाला मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर तेली समाजाचे संतशिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या मूर्तीला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या वेळी जय संताजी तेली समाज मंडळाचे अध्यक्ष सतीश वैरागी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, तेली समाज आणि संताजी महाराज यांचे अतूट नाते आहे. आज समाजाची ओळख संताजी महाराजांमुळे असून तेली समाजाने नेहमी एकजुटीने राहिले पाहिजे. समाजातील मुलांना प्रोत्साहन मिळण्याकरिता नेहमी समाजाने पुढाकार घेतला पाहिजे. सामाजिक कार्यकर्ते सुनील विभुते यांनी समाजाच्या दुर्लक्षित घटकापर्यंत जाऊन त्यांच्या अडीअडचणीत मदत करण्याचे नमूद केले. तसेच समाजामधील कोणालाही कुठली अडचण आल्यास अर्ध्या रात्री मदतीस धावून येणार असल्याचे उपस्थितांना वचन दिले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिला मंडळाचा हळदी-कुंकू कार्यक्रम पार पडला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पार पडल्यावर अवघ्या 23व्या वर्षात सीएच्या परीक्षेत चमकदार कामगिरी करून परीक्षा पास झाल्याबद्दल निखिल अनिल खोंड याचा समाजाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया डिंगोरकर यांनी, तर आभार कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील खळदे यांनी मानले. या वेळी पत्रकार प्रशांत शेडगे, गणेश महाडिक, शिवशंकर साहू, महेश साहू, ॠषीकेश खळदे, गणेश धोत्रे, तुकाराम किर्वे, रमेश जगनाडे, प्रवीण धोत्रे, गजानन शेलार, अमित जगनाडे, अनिल खोंड, शुभांगी खळदे आणि शेकडो समाज बांधव उपस्थित होते.