मच्छिंद्र पाटील यांची पोलीस संरक्षणाची मागणी
पनवेल ः रामप्रहर वृत्त
तालुक्यातील उसर्ली खुर्द ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच विश्वास लक्ष्मण भगत यांनी बनावट बांधकाम परवाना देऊन पदाचा गैरवापर केला. याबाबत मच्छिंद्र आत्माराम पाटील यांनी पाठपुरावा केल्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याचा मनात राग धरून विश्वास भगत यांच्यापासून मला व माझ्या कुटुंबियांना धोका असून पोलीस प्रशासनाने संरक्षण देण्याची मागणी मच्छिंद्र पाटील यांनी केली आहे. याबाबत त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे. उसर्ली खुर्दचे तत्कालीन सरपंच विश्वास लक्ष्मण भगत यांनी बिल्डरांना बांधकाम करण्यासाठी बनावट परवाने दिल्याचे उघड झाले होते. याबाबत मच्छिंद्र आत्माराम पाटील व ग्रामस्थांनी माहिती अधिकाराचा वापर करून राजिपकडे पुरावे सादर केले होते. त्यानंतर चौकशीअंती विश्वास लक्ष्मण भगत दोषी आढळल्याने आदेशानुसार त्यांच्यावर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वास लक्ष्मण भगत हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून गुन्हा दाखल केल्याचा राग मनात धरून ते व त्यांच्या भावाची मुले समिर भगत, शुभम भगत, सौरभ भगत यांच्यापासून धोका असल्याचे मच्छिंद्र पाटील यांनी निवेदनात नमूद केले असून आपल्याला पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.