Breaking News

खोपोलीत बेसुमार माती उत्खनन

खालापूर : प्रतिनिधी

खोपोली नगरपालिका हद्दीत विणानगर, आशियाना इस्टेटला लागून असलेल्या डोंगरावर मागील अनेक दिवसांपासून बेसुमार माती उत्खनन सुरू आहे. मात्र तक्रारी करूनही नगरपालिका व महसूल विभागाचे त्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी व सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

खोपोलीत दोन वर्षांपूर्वी नैसर्गिक डोंगरावर अनधिकृतपणे  माती उत्खनन करण्याची जणू स्पर्धा सुरू झाली होती. दरम्यान पावसाळ्यात भूस्खलन होऊन रहिवासी भागावर दरड व  डोंगराचा मोठा भाग आल्याने महसूल व नगरपालिका प्रशासनाकडून डोंगर भागातील माती उत्खनन पूर्णपणे बंद करण्यात आले होते. मात्र मागील दोन महिन्यांपासून पुन्हा काही मुजोर विकासक व माती माफियांनी डोंगर पोखरण्याची मोहीम सुरू केली आहे.

नगरपालिका हद्दीतील विशेषतः विणानगर, आशियाना इस्टेट, ड्रीमलँड, काटरंग, मोगलवाडी, सहकार नगर, वर्धमान नगर या रहिवासी भागात जेसीबी, बुलडोझर, डंपर व अन्य यांत्रिकी सामुग्री वापरून डोंगर पोखरण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, या भागात माती घेवून जाणार्‍या डंपरची दिवसभर वर्दळ असल्याने संपूर्ण परिसरात ध्वनी प्रदूषणासह धूळ व मातीचा लोट निर्माण होऊन नागरिक त्रासले आहेत. त्याबाबत स्थानिक रहिवाशांकडून वारंवार तक्रारी करूनही नगरपालिका व महसूल विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. मात्र खालापुर महसूल विभागाकडे विचारणा केली असता, अशी कोणतीही नवीन तक्रार आमच्याकडे दाखल झालेली नाही, असे सांगण्यात आले. मंडळ अधिकार्‍यांकडे  विचारणा केली असता, त्यांनी या बाबत माहिती घेऊन तातडीने योग्य कार्यवाही केली जाईल असे सांगितले. मात्र सुरू असलेले माती उत्खनन बंद का होत नाही, या बाबत बोलण्यास असमर्थता दाखवली.

स्थानिकांचा विरोध

मोठ्या प्रमाणावर माती उत्खनन होत असल्याने येणार्‍या पावसाळ्यात विनानगर, आशियाना इस्टेटसह अन्य रहिवासी भागावर दरड कोसळण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक व विनानगर रहिवासी संघाकडून येथील बेसुमार माती उत्खनन त्वरित थांबविण्याची मागणी केली जात आहे.

विणानगर भागातील डोंगरावर मोठ्या प्रमाणावर माती उत्खनन  सुरू आहे. माती वाहक डंपर सकाळपासून संध्याकाळी उशिरापर्यंत धावत असून, यामुळे या परिसरात ध्वनी प्रदूषण तसेच धूळ व मातीचा लोट निर्माण होऊन नागरिक त्रासले आहेत. या बाबत तक्रारी करूनही कोणतीही कारवाई होत नाही.

-विजया अनिल पाटील, सदस्या, विणानगर महिला मंडळ, खोपोली

Check Also

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपच्या निरंजन डावखरेंची विजयी हॅट्ट्रिक

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार …

Leave a Reply