2020चा फेब्रुवारी महिना हा वैशिष्ट्यपूर्ण ठरला. मुळात या फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस आले. 29 फेब्रुवारी ही तारीख साधारणपणे चार वर्षांनी येते. हा जन्मदिवस फार कमी लोकांचा आहे. एकेकाळच्या काँग्रेसच्या अनभिषिक्त सम्राज्ञी म्हणून ओळखल्या जाणार्या इंदिरा गांधी यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत टक्कर देणारे ज्येष्ठ गांधीवादी नेते मोरारजी देसाई यांचा जन्मदिवस. तसं पाहता संयुक्त महाराष्ट्राच्या मुळावर उठलेले मोरारजी यांच्यानंतर संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे अग्रणी साथी श्रीधर महादेव जोशी म्हणजेच एसएम अण्णा हे नंतर मोरारजी यांच्या पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष होते. सन 1969च्या बंगळूरूच्या काचघरात काँग्रेसचे दोन भाग झाले. त्यातील एकाचे नेतृत्व इंदिरा गांधी यांच्याकडे होते, तर दुसर्याचे मोरारजी देसाईंकडे.
इंडिकेट म्हणजे इंदिरा काँग्रेस आणि सिंडिकेट म्हणजे संघटना काँग्रेस, जी मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली 1977पर्यंत कार्यरत होती व लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेल्या जनता पक्षात विलीन झाली. मोरारजी यांच्या हाती जयप्रकाश यांनी 1977 साली जनता राजवटीची सूत्रे दिली. 1977 ते 1979 अशी दोन वर्षे मोरारजी हे भारताचे पंतप्रधान होते. कट्टर प्रशासक असलेल्या मोरारजी यांचा जन्म 29 फेब्रुवारी 1896 रोजी वलसाड येथे झाला. 99 वर्षे जगलेल्या या ज्येष्ठ गांधीवादी नेत्याने 10 एप्रिल 1995 रोजी मुंबईत आपला देह ठेवला. भारतरत्न आणि निशान-ए-पाकिस्तान हे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांचे सर्वोच्च किताब मिळालेले मोरारजी हे बिगर काँग्रेसचे पंतप्रधान होते.
महाराष्ट्रातील लेखिका आणि कवयित्री शुभांगी जयंत लेले यांचाही 29 फेब्रुवारी हा वाढदिवस. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चळवळीत झोकून देऊन काम करणार्या प्रखर महिला कार्यकर्त्या आणि सावरकर यांच्या सहकारी इंदिराबाई लेले यांच्या शुभांगी या स्नुषा (सूनबाई). त्यामुळे 29 फेब्रुवारी हा दिवस पक्का लक्षात राहणारा म्हणावा लागेल. या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बर्याच गोष्टी गाजल्या. महाराष्ट्र विधिमंडळाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीतील पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन, तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचेही पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा 26 तारीख हा आत्मार्पण दिवस, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन तथा तात्यासाहेब शिरवाडकर म्हणजेच कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येत असलेला 27 फेब्रुवारी हा जागतिक मराठी दिवस ही या आठवड्यातली वैशिष्ट्ये. मुंबई, महाराष्ट्रात हे दिवस उत्साहात साजरे करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 54व्या आत्मार्पण दिनानिमित्त दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये असलेल्या सावरकरांच्या राष्ट्रीय स्मारकात जनता पक्षाचे माजी अध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे नेते, थोर अर्थतज्ज्ञ आणि प्रकांडपंडित डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सध्या देशात ज्या ज्वलंत विषयावर वातावरण पेटले आहे, त्या नागरिकत्व कायदा विषयावर त्यांचे व्याख्यान होते. डॉ. स्वामी हे परखड मते मांडण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दिलेल्या विचारांनी देश चालला असता, तर आज सीएए, एनआरसीसारखे कायदे लागू करायची वेळ आली नसती. या प्रसंगी आचार्य बाळाराव सावरकर लिखित चार खंड आणि ’सावरकरांवरील असत्याचे प्रयोग’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपचे आमदार अतुल भातखळकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष अरुण जोशी, कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्नील सावरकर उपस्थित होते. आसाम कराराच्या वेळी पंतप्रधान राजीव गांधी यांनी एनआरसी लागू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर कुठलीही कार्यवाही झाली नाही. सत्तेवर आल्यानंतर 2016 साली या विषयावरील एक समिती केंद्र सरकारने स्थापन केली. तिचा अहवाल 2018 साली आल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्याचा विचार होत आहे, मात्र अद्याप एनआरसी लागू झालेली नाही. कारण या विषयावर संसदेत साधकबाधक चर्चा होईल. नंतरच तिचा अंतिम मसुदा होईल. आता काँग्रेस आणि अन्य पक्षीय विरोधकांकडून जाणीवपूर्वक दंगे माजवले जात आहेत, असेही डॉ. स्वामी यांनी सांगितले.
भारतात फाळणी झाल्यानंतर मुस्लिमांना स्वतंत्र देश मिळाला, तसेच या धर्मातील वेगवेगळ्या पंथांसाठीही स्वतंत्र राष्ट्रं आहेत, मात्र हिंदूंसाठी स्वतंत्र देश नसल्यामुळे नागरिकत्व कायद्यात त्यांना प्राधान्य दिले तर बिघडते कुठे, असा सवाल करीत डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी म्हणाले की, गुप्तचर संस्थांच्या अहवालानुसार भारतात बाहेरून आलेल्या मुसलमानांची संख्या जवळपास नाहीच, मग इथल्या मुसलमानांना किंवा विरोधकांना त्यांचा पुळका कशाला?
मुस्लिम देशांमध्ये एकता आहे. त्यामुळेच त्यांच्या देशांत ते अपेक्षित कायदे लागू करू शकतात, मात्र भारतात कुठलाही कायदा करायचा तर आधी वादात अडकतो. देशाच्या अखंडतेसाठी सीएए, एनआरसीसारख्या कायद्यांची आवश्यकता आहे, असेही डॉ. स्वामी म्हणाले. भारतीय जनता पक्षाचे कांदिवली येथील तडफदार आमदार अतुल भातखळकर हेही या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. माफीवीर म्हणून हिणवणार्यांना कोल्हूला जुंपण्याची आवश्यकता आहे. त्याशिवाय नालायक, हरामखोर सुधारणार नाहीत, अशा शब्दांत भातखळकर यांनी सावरकर विरोधकांना फटकारले. जे झोपलेत त्यांना जागे करता येते, पण ज्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे अशा सोंग घेतलेल्यांना जागे करता येत नाही, असेही ते म्हणाले. सावरकर यांच्या अंदमान पर्वानंतर त्यांनी देशासाठी काय केले, असा सवाल टीकाकारांनी केला, तर त्याला चोख उत्तर देण्यासाठी आचार्य बाळाराव सावरकर यांनी लिहिलेले सावरकर पर्वांचे चार खंड हे चोख उत्तर आहे. त्यामुळे त्यांनी फार मोठे कार्य केले आहे. त्यांनी त्यांच्या जीवनात केलेले हे कार्य फार मोलाचे आहे, असे विचार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी व्यक्त केले.
डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी नागरिकता कायद्याबद्दल व्यक्त केलेले विचार हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांना अनुसरून आहेत. सावरकरांनी त्या वेळी देशातील नागरिकांची जनगणना करण्यावर भर दिला होता. त्यांची विचारधारा ही देशाच्या प्रत्येक संवेदनशील मुद्द्यावर मार्गदर्शक आहे. म्हणूनच या विचारांचा अंगीकार राज्यकर्त्यांनी केला पाहिजे. नागरिकत्व कायद्याच्या बाजूने उभे राहणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. हे करीत असतानाच देशभक्तीची भावनादेखील आपण सर्वांनी बळकट केली पाहिजे, असे विचार स्मारकाचे अध्यक्ष अरुण जोशी यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. स्वामी आणि आमदार भातखळकर यांना स्मारकाच्या वतीने कोल्हूची प्रतिमा आणि सावरकर विचारांवरील ग्रंथसंपदा भेट दिली. सावरकरांवरील आरोपांचे खंडन करणार्या पुस्तकाचेही या वेळी प्रकाशन करण्यात आले. आचार्य बाळाराव सावरकर यांच्या या चारही खंडांच्या निर्मितीसाठी सहकार्य करणार्या संगीता अमलाडी, वैद्य चिंतामण साठे, दुर्गेश परुळकर, डॉ. सुबोध नाईक, मंदार जोशी, श्रीकांतजी यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी श्रोत्यांच्या प्रश्नोत्तराचे सत्र झाले. आत्मार्पण दिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह तुडुंब भरले होते.
सावरकरांच्या 54व्या आत्मार्पण दिनानिमित्त भारतीय जनता पक्षानेसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घडवून आणले. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, प्रसाद लाड आदींनी प्रमुख मार्गदर्शन केले. जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त राज्य सरकार, महाराष्ट्र विधान मंडळ, भारतीय जनता पक्ष अशा विविध व्यासपीठांवर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आणि मराठी भाषेबद्दल प्रत्येकाने आपापल्या परीने भावना व्यक्त केल्या. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मागणीपासून ते शाळांमध्ये मराठी भाषेचे शिक्षण सक्तीचे करण्यात यावे, अशा मागण्या केल्या गेल्या. महाराष्ट्र राज्य स्थापन होऊन 60 वर्षे होत आली तरीही महाराष्ट्रात मराठी भाषेची सक्ती करावी लागते हे दुर्दैवच म्हणावे लागेल, असे कटू सत्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अखेर सांगावे लागले. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितल्याप्रमाणे राजकारण केवळ निवडणुकीपुरते असावे. निवडणुका झाल्या की राजकारण विसरून सर्वांनी विकासाभिमुख समाजकारण करावे. तरच राज्याचा आणि पर्यायाने देशाचा विकास होऊ शकतो. हे विधान आदर्श मानून सर्वांनी मिळून मिसळून एकत्रितपणे कार्य करावे. प्रभू रामचंद्र काय, छत्रपती शिवराय आणि सावरकर काय हे राजकारणाचे मुद्दे नाहीत, तर त्यांच्या विचारांवर, विचारांच्या शिदोरीवर मार्गक्रमण करणे हेच महत्त्वाचे आहे. जय सावरकर! जय महाराष्ट्र!!
-योगेश त्रिवेदी