खोपोली : प्रतिनिधी
येथील एसटी स्टॉपवर बुधवारी बसमध्ये चढणार्या प्रवाशाच्या खिशातील मोबाइल चोरल्याची घटना घडली होती. त्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासून खोपोली पोलिसांनी खालापूर टोलनाक्यावर सापळा लावला आणि मोबाइलचोरांच्या टोळीला अवघ्या काही तासांत ताब्यात घेतले. त्यांच्याकडील एक लाख 34 हजार 700 रुपये किमतीचे मोबाइल जप्त करण्यात आले.
वावोशी (ता. खालापूर) येथील मितेश जाधव हे कामानिमित्त बुधवारी खोपोलीत आले होते. परतीच्या प्रवासासाठी ते खोपोली स्टँडवरून पेण बसमध्ये चढताना चोरट्याने त्यांच्या खिशातील मोबाइल चोरून पोबारा केला. याबाबत मितेश यांनी खोपोली पोलिसांत तक्रार दिली. पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून त्वरित लोणावळा बाजूला पोलीस पथक पाठविले. शिळफाटा, मुंबई- पुणे महामार्गावरील इंदिरा चौक यासह शेडुंग फाटा व खालापूर टोलनाका येथे पोलिसांनी नाकाबंदी केली. दरम्यान, मोबाइल चोरटे क्वालिस (एमएच-05,जी-2346) गाडीतून एक्स्प्रेस वेमार्गे पनवेलच्या दिशेने निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी क्वालिस गाडी अडवून गाडीतील भूषण प्रेमनाथ गारुंगे (वय 41, रा. अंबरनाथ -कातकरवाडी), केतन सूर्यकांत पवार (वय 20, सुभाषवाडी, वांद्रापाडा), अमोल सुरेश टिडींगे (वय 35, वांद्रापाडा), हरिष शिवाजी जाधव (वय 29, वांद्रापाडा) आणि राहुल हरिष शिंदे (वय 29, शास्त्रीनगर अंबरनाथ) यांना ताब्यात घेतले. या मोबाइल चोरट्यांना खालापूर न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.