Breaking News

कालव्याला पाणी सोडा, अन्यथा आंदोलन अमित घाग यांचा इशारा

रोहा पाटबंधारे विभागाच्या कारभाराविरोधात भाजप आक्रमक

धाटाव : प्रतिनिधी

कोलाड ते भुवनेश्वर आणि कोलाड ते पडम या  डाव्या, उजव्या कालव्यांना त्वरीत पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने रोहा पाटबंधारे विभागाकडे सोमवारी (दि. 18) निवेदनाद्वारे करण्यात आली. शेती आणि पिण्यासाठी या दोन्ही कालव्यांना तातडीने पाणी सोडले नाही तर जनतेच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा इशारा भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित घाग यांनी या वेळी पाटबंधारे विभागाला दिला.

भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित घाग यांनी सोमवारी पाटबंधारे विभागाचे रोहा येथील उप अभियंता अतुल आगवणे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी युवा मोर्चाचे रोहा तालुका अध्यक्ष राजेश डाके, कामगार आघाडीचे अध्यक्ष विलास डाके, ज्येष्ठ नेते तारु शेट यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

प्रामुख्याने सिंचन व पिण्यासाठी कोलाड ते भुवनेश्वर आणि कोलाड ते पडम या कालवे काढण्यात आहेत. गेल्या काही वर्षापासून सिंचनाकरिता पाणी सोडण्यात येत नाहीत मात्र कालव्यांच्या साफसफाई करिता खर्च करण्यात येत आहे, असे अमित घाग यांनी या वेळी निदर्शनास आणून दिले.

या कालव्यांच्या तीरावर असणार्‍या नागरिकांना व शेतकर्‍यांना सध्या मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

काही गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. मुक्या जनावरांनादेखील पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन   पाटबंधारे विभागाने कोलाड ते भुवनेश्वर आणि कोलाड ते पडम या डाव्या आणि उजव्या कालव्यांना पाणी सोडण्यात यावे, असे भाजपतर्फे सोमवारी रोहा पाटबंधारे विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पाटबंधारे विभागाने या कालव्यांना पाणी सोडण्याचा निर्णय घेतला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा  युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग यांनी या वेळी रोहा पाटबंधारे विभागाला दिला.

भाजपच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाची प्रत आमचे वरिष्ठ अधिकारी राकेश धावडे त्यांना तातडीने पाठवण्यात येईल तसेच संबंधित उपविभागांनाही कळविण्यात येईल.

-अतुल आगवणे, उप अभियंता, रोहा पाटबंधारे विभाग

Check Also

रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्‍या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील …

Leave a Reply