मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील सत्तास्थापनेत शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी जुळवून घेत सरकार स्थापन केले. हे सरकार पाच वर्षे टिकेल, असा दावा तिन्ही पक्षांचे नेते करीत आहेत, मात्र अनेक मुद्द्यांवरून महाविकास आघाडीतील कुरघोडी समोर येत आहेत. अशातच राज्यातील सत्तास्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा बुचकळ्यात टाकणारे ट्विट केले आहे. या ट्विटचा अर्थ नेमका काय असेल, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
संजय राऊत ट्विटमध्ये म्हणतात की, ’कुछ रिश्ते दरवाजे खोल जाते हैं, या तो दिल के, या तो आँखों के’. महाविकास आघाडीच्या निमित्ताने शिवसेनेचे नवे नाते काँग्रेस-राष्ट्रवादीशी जुळले आहे. मग या नात्याने शिवसेनेच्या मनात जागा केली आहे की त्यांचे डोळे उघडले आहेत, असा अर्थ काढला जात आहे.
अलीकडेच एल्गार परिषदेचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) देण्यावरून वाद निर्माण झाला होता. एल्गार परिषदेचा तपास केंद्राकडे देऊ नये, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने ठामपणे घेतली, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाराचा वापर करीत हा तपास ‘एनआयए’कडे देण्याची परवानगी दिली. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एल्गार परिषदेचा तपास आम्ही दिला नाही, तर तो केंद्राने काढून घेतला, अशी भूमिका घेतली.
सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) अशा मुद्द्यांवरूनही महाविकास आघाडीत मतभेद आहेत. ‘सीएए’वरून काँग्रेसने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले होते. इतकचे नाही तर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाही सरकारमधील मंत्र्यांमध्ये विसंवाद दिसून येत आहे. मुस्लिम आरक्षणावरून अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी सभागृहात मुस्लिमांसाठी कायदा बनवू अथवा अध्यादेश काढू, अशी भूमिका मांडली, तर पत्रकार परिषदेत हा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारला असता अद्याप माझ्याकडे असा काही विषय आला नाही. शिवसेनेची भूमिका अद्याप ठरली नाही, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री आणि मंत्री यांच्यात संवाद नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो. अशातच शिवसेना नेते संजय राऊतांनी केलेल्या ट्विटमागे बराच अर्थ दडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.