एक ठार, दोन जखमी, वाहनांचे नुकसान
माणगाव : प्रतिनिधी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धरणाचीवाडी गांवाच्या हद्दीत बस थांब्याजवळ बुधवारी (दि. 29) पहाटेच्या सुमारास स्विफ्ट कारने ट्रेलरला जोरदार धडक दिली. या अपघातात स्विफट कारच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघेजण जखमी झाले. शिवाय दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.
चालक सतिश बाळकृष्ण वाघमारे (वय 30), मिलिंद शिवराम साळुंखे व मंगेश नथुराम साळुंखे (सर्व रा. वासुंडे, ता. सुधागड) हे स्विफ्ट कार (एमएच-46,एन-8094) ने माणगांव बाजूकडून मुंबई बाजूकडे जात होते. त्याचवेळी मुंबई बाजूकडून गोवा बाजूकडे ट्रेलर (एमएच-46,बीएफ-4885) जात होता. बुधवारी पहाटे 6.30 वाजण्याच्या सुमारास धरणाचीवाडी गांवाच्या हद्दीत स्विफ्ट कारने समोरुन आलेल्या ट्रेलरला धडक दिली.
या अपघातात स्विफ्ट कारचा चालक सतिश वाघमारे जागीच ठार झाला तर कारमधील मिलिंद साळुंखे व मंगेश साळुंखे हे दोन प्रवासी जखमी होवून, दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. या अपघाताची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस नाईक सी. आर. अंबरगे करीत आहेत.