मंत्री गणेश नाईक यांची प्रमुख उपस्थिती; अभिनेते-व्याख्याते शरद पोंक्षे करणार विवेचन
पनवेल : रामप्रहर वृत्त
देशप्रेमाचे व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या वंदे मातरम् या स्फूर्तिदायी गीताच्या 150व्या वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे देशभरात विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने नवीन पनवेलमधील के.आ. बांठिया विद्यालय येथे शुक्रवारी (दि. 7) सायंकाळी 4 वाजता वंदे मातरम् समूह गायन या विशेष कार्यक्रमाचे आयोजन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आल्याची माहिती कार्यक्रम प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी अभिनेते व प्रसिद्ध व्याख्याते शरद पोंक्षे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितीत राहून वंदे मातरम गीताची पार्श्वभूमी व महत्त्व यावर मार्गदर्शन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
थोर कवी आणि तत्वज्ञ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1875 साली रचलेल्या वंदे मातरम् या गीताला 7 नोव्हेंबर रोजी 150 वर्ष पूर्ण आहेत. या पार्श्वभूमीवर हा विशेष कार्यक्रम होत आहे. या संदर्भात पनवेल मार्केट यार्ड येथे झालेल्या पत्रकार परिषदेला कार्यक्रम प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, अॅड. प्रकाश बिनेदार, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, भाजपचे पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंझारराव, नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे, पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, यतीन पाटील आदी उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी या कार्यक्रमाच्या संदर्भात माहिती देताना पुढे सांगितले की, भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने वंदे मातरम् गीताच्या 150 वर्षांच्या उल्लेखनीय परंपरेचा उत्सव राष्ट्रीयस्तरावर साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप कार्यकर्ते आणि लोकसहभागातून हा उत्सव व्यापक प्रमाणात साजरा होणार आहे. त्या अनुषंगाने भाजप देशभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सामूहिक वंदे मातरम् गायन, देशभक्तीपर रॅली तसेच जनजागृती उपक्रमांचे आयोजन करणार आहे. हे सर्व कार्यक्रम आगामी संविधान दिन (26 नोव्हेंबर)पर्यंत चालणार आहेत. देशभरात 150 ठिकाणी, तर महाराष्ट्रात नागपूर, अकोला, ठाणे, रायगड, पुणे, अहिल्यानगर, कराड सातारा, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर या 10 ठिकाणी कार्यक्रम होणार असून रायगड जिल्ह्याचा कार्यक्रम 7 नोव्हेंबरला नवीन पनवेल येथे होणार आहे.
वंदे मातरम् हे गीत भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील राष्ट्रप्रेम, ऐक्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे. ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या लढ्यात या गीताने असंख्य स्वातंत्र्यसैनिकांना प्रेरणा दिली. हे गीत केवळ शब्दांची अभिव्यक्ती नसून भारतीय जनतेच्या भावविश्वाचे, स्वातंत्र्याच्या उत्कटतेचे आणि मातृभूमीवरील प्रेमाचे द्योतक आहे. वंदे मातरम्च्या इतिहासाची आणि राष्ट्रवादाच्या प्रेरणेची जनसामान्यांना माहिती करून देणे, युवकांमध्ये देशभक्तीची भावना दृढ करणे, भारतीय संविधानाच्या मूल्यांचा प्रचार व प्रसार आणि त्या अनुषंगाने राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्याला बळकटी देणे हे या कार्यक्रमांचे प्रमुख उद्देश आहेत. त्यानुसार बांठिया विद्यालय येथे होणार्या या कार्यक्रमात विविध विद्यालयांचे अडीच हजारांहून अधिक विद्यार्थी, विविध संस्था, संघटना, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार असून नागरिकांनीही या महत्त्वपूर्ण उत्सवात सहभाग घ्यावा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper