कर्जत : बातमीदार
भीमाशंकर राज्यमार्ग रस्त्याचा भाग असलेल्या कर्जत तालुक्यातील कशेळे-नेरळ रस्त्यावरील वळणे आणि चढ-उतार कमी करण्यात येत असून, त्यावर डांबरीकरण केले जात आहे.
कशेळे-नेरळ राज्यमार्ग रस्त्याची अवस्था मागील काही वर्षात खराब झाली होती. 12 किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावरील अवघड वळणे कमी करण्याचे आणि तीव्र उतार कमी करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर केले आहे. त्यासाठी तब्बल तीन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या रस्त्याचे काम ठाणे येथील ठेकेदार कंपनी करीत आहे.
या रस्त्यावर चार ठिकाणी असलेले मोठे उतार हे कमी करण्यात येत आहेत. तर काही ठिकाणी असलेली वळणांची तीव्रतादेखील कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या रस्त्याचे काम आणि दर्जा निविदेप्रमाणे व्हावा, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि त्यांचे अभियंते रस्त्यावर बसून लक्ष ठेवीत आहेत. त्यामुळे मे महिन्यांपूर्वी किमान कशेळे-नेरळ रस्त्यावरील 7 किलोमीटरचा भाग चांगला होईल, असा दावा केला जात आहे.