पेण : प्रतिनिधी
तालुक्यातील बहीरामकोटक गावातील बाह्यकाठ्या (संरक्षक बंधारा)च्या कामामुळे तेथील स्थानिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. पेण तालुक्यातील नारवेल बेनवले या 17 किमी खारबंदिस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, मात्र शासनाच्या आडमुठ्या धोरणाचा फटका स्थानिक मच्छीमारांना बसू लागला आहे. बहीराम कोटक येथील मच्छीमारांनी कैफियत शासनदरबारी मांडूनसुद्धा त्यांच्या निवेदनाला शासनाने केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे या परिसरातील मच्छीमार बांधव संतप्त झाले आहेत.
खारबंदिस्तीच्या कामाला स्थानिकांचा विरोध नसून मच्छीमारांच्या व्यवसायाचा विचार करून शासनानेदेखील त्यांचे म्हणणे ऐकणे गरजेचे आहे. बहीराम कोटक येथे गेल्या कित्येक वर्षापासून स्थानिकांच्या मच्छीमार होड्या लावण्यासाठी बंदर असून, तेथे आजही होड्या लावल्या जात आहे, मात्र खार बंदिस्तीचे काम करत असताना हे बंदर उद्ध्वस्त करून होड्यांना वार्यावर सोडण्याचे प्रकार सुरू आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे मच्छीमार बांधवांचा बाह्यकाठ्याच्या कामाला विरोध नसून जी बंदिस्ती आहे, तेथूनच काम करण्यास हरकत नाही.
दरम्यान, पोटावर पाय देण्याचा प्रयत्न केल्यास आत्मदहन करू, असा इशारा स्थानिक मच्छीमारांनी दिलाय.