मुंबई : प्रतिनिधी
अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तूल नॉर्वेमधील पाणबुडे आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सीबीआयने ठाण्याजवळील खारेगाव खाडीतून शोधून काढले आहे. तपासाशी संबंधित दोन वरिष्ठ अधिकार्यांनी ही माहिती दिली.
पुण्यात 2013मध्ये दाभोलकरांची मॉर्निंग वॉकला चालले असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली होती. या पिस्तुलाचा शोध घेण्यासाठी मदत करणार्या दुबईस्थित एन्विटेक मरीन कन्सल्टंटने नॉर्वेमधून यंत्रसामुग्री मागवली होती. अखेर ठाण्यातील खारेगाव खाडीत पिस्तूल सापडले. सापडलेले पिस्तूल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. तपासणी अहवालानंतरच हे पिस्तूल दाभोलकरांच्या हत्येत वापरण्यात आले होते की नव्हते हे स्पष्ट होणार आहे.