जयपूर : वृत्तसंस्था
राजस्थान राज्य कबड्डी असोसिएशनने आयोजित केलेल्या 67व्या वरिष्ठ पुरुष व महिला गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत भारतीय रेल्वेने दोन्ही विभागांत विजेतेपद पटकावत सलग दुसर्यांदा डबल धमाका केला. रेल्वेच्या महिलांनी 33 वेळा या स्पर्धेवर आपले नाव कोरले. त्यातील 31 वर्षे सलग विजेतेपद मिळवत त्यांनी एक वेगळा विक्रम केला, तर रेल्वेच्या पुरुष संघाने 22व्यांदा या विजेतेपदावर आपले नाव कोरले.
जयपूर येथील पूर्णिमा विद्यापीठाच्या संकुलात मॅटवर झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात भारतीय रेल्वेने हिमाचल प्रदेशचे कडवे आव्हान 40-34 असे परतवून लावत सलग दुसर्यांदा विजेतेपद आपल्याकडे राखले. पहिल्या डावात सावध खेळ करीत 16-15 अशी आघाडी घेणार्या रेल्वेला उत्तरार्धातदेखील हिमाचलने चांगलेच झुंजविले, पण रेल्वेच्या या कठीण प्रसंगी एकेकाळची महाराष्ट्राची व आता रेल्वेकडून खेळणारी सोनाली शिंगटे धावून आली. तिने शेवटच्या काही मिनिटांत एका चढाईत दोन गडी टिपत हा सामना रेल्वेच्या बाजूने झुकवला. रेल्वेच्या या विजयात सोनाली शिंगटेने आठ बोनस व पाच झटापटीत असे एकूण 13 गुण मिळविले. पूजाने तिला छान साथ देत चढाईत नऊ गुण, तर पायल चौधरीने पाच गुण मिळविले. पिंकीने चार व रितू नेगीने तीन पकडी करीत बचावाची बाजू भक्कम सांभाळली. हिमाचलकडून निधीने चढाईत 12 गुण, तर पुष्पाने चढाईत सहा गुण घेत चांगली लढत दिली. भावनाने तीन गुण चढाईत व दोन गुण पकडी करीत मिळवत त्यांना छान साथ दिली.
अत्यंत चुरशीच्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात भारतीय रेल्वेने सेना दलाचा कडवा प्रतिकार 29-27 असा मोडून काढत सलग दुसर्यांदा विजेतेपद आपल्याकडे राखले. सेना दलाला सलग तिसर्या वर्षी उपविजेत्यापदावर समाधान मानावे लागले. आक्रमक सुरुवात करीत सेना दलाने मध्यांतराला 17-11 अशी आघाडी घेत वर्चस्व राखले होते, पण उत्तरार्धात त्यांना ही आघाडी टिकविता आली नाही. रेल्वेने आपला खेळ गतिमान करीत विजयश्री खेचून आणली. रेल्वेच्या या विजयात पवन शेरावत, विकास, धर्मराज चेलवनाथन, सुनील चमकले. पवनने चढाईत सात व पकडीत एक गुण मिळविला. विकासने चढाईत सहा गुण कमावले. धर्मराज व सुनीलने प्रत्येकी तीन पकडी केल्या. सेना दलाकडून नवीनकुमारने चढाईत सात गुण मिळविले. रोहित कुमारला या सामन्यात प्रभाव पाडता आला नाही. त्याला फक्त तीन गुण मिळविता आले. संदीप धुलने सहा, तर सुरजितने चार पकडी केल्या.
याआधी झालेल्या महिलांच्या उपांत्य फेरीत रेल्वेने झारखंडला 39-19, तर हिमाचलने हरियाणाला 34-32 असे पराभूत करीत अंतिम फेरी गाठली होती. पुरुषांच्या उपांत्य फेरीत रेल्वेने राजस्थानला 46-23, तर सेना दलाने उत्तर प्रदेशाला 49-31 असे पराभूत करीत अंतिम फेरीत धडक दिली होती.
Check Also
तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड
पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …