Breaking News

500 फूट खोल दरीत पडलेल्या पर्यटकाला जीवदान

कर्जत ः बातमीदार

नवी मुंबई येथून सहा ट्रेकर्सची टीम पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आली होती, परंतु त्यातील एकाचा पाय घसरून तो 500 फूट दरीत कोसळला. घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस व माथेरान येथील सह्याद्री रेस्क्यू टीम यांनी अथक प्रयत्न करून या पर्यटकाचे प्राण वाचवले आहेत. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत माथेरानजवळ शिवकालीन पेब किल्ला आहे. त्याला विकटगड असेही नाव आहे. शनिवारी पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी नवी मुंबई व कल्याण येथून सहा जणांचा एक ग्रुप नेरळ येथे आला होता. सकाळी त्यांनी नेरळ आनंदवाडी येथून मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी स्थानिक आदिवासी यांनी त्यांना वाटाड्या सोबत घेऊन जा, असा सल्ला दिला, मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत हा ग्रुप किल्ल्याच्या दिशेने पुढे गेला. यात तीन महिलांचादेखील समावेश होता. किल्ल्याच्या जवळपास पोहचताच दुपारी एकच्या सुमारास त्यातील कल्याण येथील रमेश कुमार रामनाथन यांचा पाय घसरून ते 500 फूट दरीत कोसळले. प्रसंगावधान राखत ग्रुपमधील लोकांनी नेरळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पडलेली व्यक्ती जिवंत असल्याचे समजताच नेरळ पोलिसांनी तातडीने माथेरानच्या सह्याद्री रेस्क्यू टीमला पाचारण केले. या दोन्ही टीमने क्षणाचाही विलंब न करता थेट पेब किल्ला गाठला. दरीत पडलेल्या रामनाथन यांचा फोन सुरू असल्याने त्यांनी आपले लोकेशन पाठवले होते. त्यामुळे त्यांना शोधणे रेस्क्यू टीमला सोपे झाले. घटनास्थळी पोहचल्यावर प्रयत्नांची शर्थ करत सह्याद्री रेस्क्यू टीमने रात्री सुमारे साडेअकराच्या सुमारास रामनाथन यांना सुखरूप नेरळ येथे आणले. या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये नेरळ पोलीस ठाण्याचे शिपाई घनश्याम पालवे, बंडू सूळ, रमेश बोडके व होमगार्ड उगले, सह्याद्री रेस्क्यू टीमचे सुनील कोळी, संदीप कोळी, उमेश मोरे, संतोष केळगणे आदी सहभागी झाले होते, तर मदतीसाठी नेरळ शिवसेना शहरप्रमुख रोहिदास मोरे, नेरळ ग्रामपंचायतीचे थेट सरपंच रावजी शिंगवा यांसह समस्त शिवसैनिक, युवा सैनिक व स्थानिक ग्रामस्थ रात्री उशिरापर्यंत उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांचा विशेष …

Leave a Reply